संस्कार
अमरावतीच्या एका
माननियानी ब्राह्मण समाजाचे कोतुक केले आहे. कौतुक करणे तसे चांगले असते. परंतु, त्याचा
अर्थ असाही होत नाही की, त्या समाजात फक्त सद्गुणच आहेत. चांगले ते घ्यावे या
विचाराप्रमाणे चांगल्या गोष्टी दाखविणे कधीही चांगलेच. तसेच त्याबरोबर विश्लेषण
केले तर दुधात साखर. समाजातील गुण-अवगुणांची जननी म्हणजे संस्कार. मुलाच्या (या
मध्ये मुलगीही आली) जन्मापासून संस्कार घडविले जातात. त्या मध्ये कांही
जाणीवपूर्वक घडवावे लागतात तर कित्येक निरीक्षणातून घडविले जातात. मूल नेहमी अवती
भोवती पाहत असते, ऐकत असते व जे पाहिले ऐकले ते स्वतः करून पाहण्याचा प्रयत्न
करते. त्यातूनच ते घडले जाते व आपले स्वतःचे व्यक्तिमत्व निर्माण करते. कोणत्याही
समाजाचे गुण-अवगुण त्या समाजातील व्यक्तिवरुन ओळखता येतात. व्यक्ति संस्कारातून
घडविली जाते. म्हणूनच संस्कार हे महत्वाचे आहेत.
शिक्षण हे सर्वात
महत्त्वाचे. शिक्षणाची सर्व सूत्रे ब्राह्मण समाजाकडे असल्यामुळे सर्वसाधारणपणे या
समाजात अशिक्षित पुरुष सापडणे दुर्मिळ. सध्या स्त्रिया सुद्धा तितक्याच शिकलेल्या
मिळतील. समाज सुशित असणे हे फार महत्वाचे आहे. कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज
यांनी हे ओळखले. त्यांनी प्रत्येक जातीतील व्यक्तींना शिक्षण घेता यावे म्हणून
कोल्हापूरात नुसती विद्यार्थी वस्तीगृहेच बांधली नाहीत तर त्यांची खाण्यापिण्याची
सोय सुद्धा केली. त्यांचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यानी स्वतःकडे कवडी नसताना
सुद्धा पुढे नेले. रयत शिक्षण संस्थेचे रोपटे त्यांनीच लावले ज्याचा आता इतका मोठा
वटवृक्ष झाला आहे की त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. या कर्मयोग्यांच्या दूर
दृष्टीमुळे महाराष्ट्रात फुले दाम्पत्यांने सुरू केलेला शिक्षण प्रसार वेगाने पुढे
सरकला. हल्ली मात्र हा वेग मंदावला आहे. जरी तो पूर्वीच्या वेगापेक्षा जास्त असला
तरी इतक्या वर्षांत जो अपेक्षित वेग आहे त्या पेक्षा कमी आहे. त्याला मुख्यत्वे
शासनाची धोरणे जबाबदार आहेत. त्याच बरोबर पालकही जबाबदार आहेत. इंग्रजीला वाघिणीचे
दूध संबोधिले जाते. परंतु, सर्वांनाच वाघिणीच्या दूधाची आवश्यकता नसते. किंबहुना
पुष्कळांना ते पचविणे जमत नाही. दुसरे सत्य हे ही आहे की देशाला वाघिणीचे दूध पचवू
शकणारे किती लोक पाहिजेत? पालकानी आपल्या पाल्याची कुवत ओळखूनच इंग्रजीचा आग्रह
धरावा. शासनाने शाळा-महाविद्यालयांची फी ठरविण्यापेक्षा शिक्षणाच्या गुणवत्तेवर
लक्ष द्यावे. शुल्क किती आकारावे ते शाळा व पालकाना ठरवू द्यावे. अशा शाळेत
शासनाने पाठविलेल्या 25 टक्के विद्यार्थ्यांना कोठलेही शुल्क न आकारता प्रवेश
मिळतो व त्यांना मोफत शिक्षण तसेच शिक्षणसाहित्य मिळते किंवा नाही एवढ्याचीच काळजी
घ्यावी.
आता जग बदलले आहे.
शिक्षकही पालक व पाल्य जसे बदलले तसेच बदलले आहेत. महाभारतातील गुरुवर्य
द्रोणाचार्याना स्वतःच्या मुलाला दूध देण्याची ऐपत नव्हती. तसे पाहिले तर
द्रोणाचार्य हे सम्राटाच्या राजपुत्रांना शिक्षण देण्यास नेमलेले आचार्य.
त्यांनी मागितले असते तर त्यांना सम्राटानी कितीतरी गाईंचा गोठा बक्षिस दिला असता.
त्यांनी इतर शिकवण्या घेतल्या असत्या तर हंड्याने दूढ विकत घेऊ शकले असते. परंतु
त्यांनी कोठलाही आडमार्ग न चोखाळता पत्निला पाण्यात पीठ मिसळून ते दूध म्हणून
देण्याचा पर्याय सांगितला व प्रत्यक्षात आणला. हे सत्य समोर आणण्याचे कारण एवढेच
की त्या काळी भ्रष्टाचाराबद्दल सर्वसामान्यांच्या भावना कशा होत्या ते
समजण्यासाठी.
ब्राह्मण समाजाने शिक्षणाच्या
माध्यमातून मुलांवर चांगले संस्कार घडविण्याचा प्रयत्न केला. त्याकरिता कीर्तने,
ग्रन्थवाचन, नाटके वगैरे साधनांचा सार्वजनिक उपयोग केलाच त्या बरोबर ज्ञानेश्वरी,
भागवत सारख्या ग्रन्थांचे सामूहिक वाचन व पन्ञतंत्र, विक्रम व वेताळ, इसापनीति
असल्या कथेतून तत्वज्ञान शिकवणाऱ्या कथांचे वैयक्तिक वाचन, वगैरेचा उपयोग केला.
हल्ली इलेक्ट्रॅान क्रांतिमुळे संस्कार घडविणे सोपे झाले आहे तसेच कठीणही. सोपे या
करिता की, दूरदर्शनचा पडदा उघडला की ज्ञानगंगा वाहण्यास सुरवात होते. पालकांना
स्वतः फारसे काम करावे लागत नाही. कठीण या करिता की, दूरदर्शनची चटक मुलांना लागली
तर ती आई-वडिलांची वाट न पाहता पडदा उघडतील व त्यावर जे असेल ते पाहत बसतील. दुसरा
अभ्यास करण्याला उत्साह दाखविणार नाहित. त्यावर उपाय करता येईल. संस्कार कार्यक्रम
ठराविक वेळेत शक्यतो शाळेच्या वेळेत 30-40 मिनिटे विना जाहिरात प्रसारित करावेत. प्रत्येक शाळेला ते दाखविण्याचे
बंधनकारक करावे. शाळेमध्ये अशा कार्यक्रमांवर वर्गात शिक्षकांनी चर्चा घडवून
आणावी. या प्रकारे सर्वच मुलांवर सारखेच संस्कार करणे शक्य होईल. पालकानी
संस्कारक्षम ग्रन्थ तसेच कथासंग्रहाचे वाचन घरी करून घ्यावे.
संस्कार जाणीवपूर्वक
वरील प्रकारे करता येणे शक्य आहे. त्याचबरोबर पालकांनी आपल्या वर्तनात योग्य बदल
केले पाहिजेत. निरिक्षणातून होणारे संस्कार हे पालक, शिक्षक तसेच इतर वडिलधाऱ्या लोकांच्या
वागणिकीतून मिळतात हे ध्यानांत ठेवलेच पाहिजे. संस्काराचे गूढ उकलण्याचा प्रयत्न
केला आहे. त्याचा फायदा घ्याल अशी आशा आहे.
No comments:
Post a Comment