सार्वजनिक वाहतुक विश्वसनीय करणे म्हणजे आधी कोंबडी का अंडे हा प्रश्न सोडवण्यासारखे आहे. बस वेळेवर मिळत नाही म्हणून नागरिक स्वतःचे वाहन वापरतात. या उलट प्रवाशांच्या सर्वेक्षणामध्ये प्रवाशी संख्या कमी असल्याने बसची संख्या वाढविणे खर्चिक वाटते. यावर तोडगा म्हणजे स्थानिक परिवहन कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर निवडक मार्गांवर दर 15 ते 30 मिनीटानी बस चालू करावी. लोकांमध्ये विश्वास निर्माण करावा की त्यां मार्गावर नियमितपणे बस मिळतील. असा विश्वास निर्माण केला तरी प्रवाशी मिळत नसतील तर 3 महिन्यानी नागरिकांना सूचना देऊन त्यानंतर 1 महिन्यानी बस बंद करावी अगर फेरीतील वेळांमध्ये वाढ करावी. या प्रकारचे सर्वेक्षण कायम चालू ठेवावे. सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीतून बसमार्ग व वेळ यांची सांगड घालावी. बससेवा विश्वसनिय झाली तर खाजगी वाहनांचे प्रमाण कमी होईल. जर पुष्कळ बस वापरूनही गर्दी आटोक्यात येत नसेल तर मेट्रो सारखे पर्याय वापरावेत.
विश्वसनिय सेवे बरोबर ती सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे. धोक्याची मुख्य ठिकाणे म्हणजे रस्ता व बसथांबा. बसकरिता शक्यतो वेगळा मार्ग असावा. रस्त्याचा काही भागाचा उपयोग फक्त बससाठीच झाला पाहिजे. इतर खाजगी अगर सार्वजनिक वाहनाकरिता या मार्गावर (रस्त्याच्या ठराविक भागांवर) परवानगी नसावी. हा नियम पाळला जावा याकरिता उपाय करावेत. असा नियम (कायदा) असावा की अशा बसमार्गावर अपघात झाला तर विमा सरंक्षण नसावे. अपघातांत सार्वजनिक बसचे नुकसान झाले तर ज्या वाहनामुळे नुकसान झाले त्या वाहनाच्या वापरर्कत्याकडून पूर्ण नुकसान भरपाई वसूल करावी. या नियमाबरोबर या राखीव पट्ट्यामध्ये वाहने उतरू / वाहने येऊ नयेत हे लक्षात ठेऊन या पट्ट्याची आखणी व बांधणी करावी. या पट्ट्यात जाणे करिता फक्त मुख्य बसस्थानकावरच सोय असावी. बस या पट्ट्यावर गेली तर फक्त पुढच्या स्थानकातच बाहेर काढता येणे शक्य व्हावे. असे केले तर इतर वाहने या पट्ट्यामध्ये येऊ नयेत याकरिता फक्त बसस्थाकांतच लक्ष ठेवणे पुरेसे होईल. चौकांमध्ये हा पट्टा सुरक्षित करण्याकरिता उड्डाणपूल, भुयारीमार्ग किंवा समतलवितलक मार्ग या पैकी जो कमी खर्चिक व व्यवहारी असेल तो पर्याय वापरावा हे ओघानेच आले. असा मार्ग रस्त्याच्या मध्यभागामधे असावा हे ही आपोआपच ठरेल.
|
Suggested Bus Stop |
|
Death Trap not Bus Stop |
अशा मार्गावर बसथांबा बांधताना प्रवाशांच्या सुरक्षितेची काळजी घेणे आत्यावश्यक आहे. ही काळजी घेताना पदपथावरील विक्रेत्याना सामावून घतले जाईल तसेच इतर वाहनांतून होणारी प्रवासी वाहतूकही टाळता येईल. या करिता पदपथापासून बसमार्गापर्यंत इतर वाहनांच्या मार्गावर उड्डाणपूल बांधावेत. या उड्डाणपूलांची रूंदी 15 ते 25 मिटर व लांबी रस्याच्या रुंदी एवढी असावी. उंची 2.24 ते 2.5 मिटर असावी. दोन्ही बाजूनां उतरते जोडमार्ग असावेत. 1:20 असा उतार धरला तर जोडरस्त्यांची लांबी साधारणपणे 45 ते 50 मिटर होईल. याचा अर्थ असा की इतर प्रवासी वाहतूक करणारी वाहने बसथांब्यापासून तितकी दूर राहतील. बसने जाणारे प्रवासी पर्यायी वाहतुकवाहनांच्या तडाख्यातून मुक्त होतील. अशा उड्डाणपूलाखालील जागा प्रवाश्याना जाण्यायेण्याकरिता खूप होईल. त्यामधील काही जागा पदपथ विक्रेत्यांना देता येईल, काही जागा स्वच्छतागृहाकरिता वापरता येईल. या प्रकारे पदपथविक्रेते व सर्वाकरिता विशेषतः महिलांकरिता लागणाऱ्या स्वच्छतागृहांचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
अशा प्रकारे नियोजन केल्यास बस वाहतूक नागरिकांच्याकरिता विश्वसनिय व सुरक्षित होईलच वर काही पदपथ विक्रेत्यांनाही सामाऊन घेता येईल, महिलांकरिता स्वच्छतागृहे बांधता येतील. पुण्यामध्ये हा प्रयोग डेक्कन जिमखाना ते तळेगांव या मार्गावर टप्प्याटप्प्याने राबविता येईल.
No comments:
Post a Comment