Tweet

Tuesday, 26 October 2010

आलमी भाईचारा (विश्वबंधुत्त्व-Universal Brotherhood)


डॉ. झाकीर नाईक, President Islamic Research Foundation याना स. न.
आपले AQSA तर्फे आयोजित केलेल्या समारंभातील 'आलमी भाईचारा' या विषया वरील विचारांचा सीडी वर प्रसिद्ध केलेला उर्दू अनुवाद ऐकला, समजून घेतला व त्या वर मनन ही केले. प्रथम या बद्दल अभिनंदन.
आपले विचार अभ्यास पूर्ण आहेत. धर्माचा आपला अभ्यास सखोल व गाढा आहे. आपण फक्त कुराणच नाही तर इतर धर्माची पुस्तके वाचून त्या मधील साम्य दाखवून दिले. उपमा देण्याची आपली हातोटी अजोड आहे. निरनिराळ्या भाषेवरील प्रभुत्व निर्विवाद आहे. आपण सांगितलेले विचार मला समजल्या प्रमाणे असे आहेत.
बंधुभाव वेगवेगळ्या समुहा करता असू शकतो, परंतु इस्लामला विश्वबंधुभाव अभिप्रेत आहे. विश्वातील लोक, काळे, गोरे, गहू वर्णी, पीत वर्णी हे सर्व एकाच दाम्पत्याची संतती आहे. पुरुष व स्त्री समान आहेत परतू, काही बाबतीत स्त्रिया पुरुषा पेक्षा श्रेष्ठ आहेत तर काही बाबतीत पुरुष. खुनी माणुसकीचा वैरी, तर, वाचवणारा दोस्त. शिलकेतील संपत्तीतून काही भाग दान द्या. नशा करू नये. खांद्याला खांदा लावा व सैतानाला आपल्या मध्ये घुसू देऊ नका. खुदा एक आहे. सूर्य म्हणजे खुदा नाही. सूर्य खुदाचा आहे. ख्रिश्चन धर्मा बाहेर येशूला मानणारे फक्त इस्लाम मध्येच आहेत. त्याची कारणे व पुरावाही आपण उत्तम प्रकारे सांगितला. देव एक आहे. अनेक नाहीत. आणि जो हे मानतो तोच आलमी भाईचारा पसरवू शकतो. जगातील सर्वच धर्मात हे सांगितले आहे. प्रत्येकाने आपले धर्मग्रंथ वाचून पाहावेत व हे समजून घ्यावे. हे जर सर्वांनी पटवून घेतले तर विश्वबंधुत्त्व पसरण्यास वेळ लागणार नाही. एकंदरीत आपल्या म्हणण्याप्रमाणे विश्वबंधुत्त्वा करता इस्लामची शिकवणूक सर्वानी आचरणात आणावी.
या नंतर काही प्रश्न श्रोत्यानी विचारले. मला जे समजले ते असे. इस्लाम धर्मीय काबाची पूजा करत नाहीत. काबा हे ईश्वर एक असल्याचे प्रतीक आहे. जगातील सर्व मुसलमान काबा कडे मुख करून ईश्वराचे आभार मानतात. काफीर हा एक अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ जो इस्लाम धर्माला मानत नाही. ही शिवी नव्हे. मोमीन म्हणजे इस्लामला मानणारे. चतुष्पादांचे मांस खाण्यात काहीही गैर नाही. भारतात ऋषी मुनी मांसाहार करत असत. वनस्पतीनाही जीव असतो. तेंव्हा वनस्पती खाणे हे कसे शाकाहार म्हणता येईल? एका प्रश्नाच्या उत्तरात धर्म बंध झुगारून विश्व बंधुत्त्वाचा विचार करण्या ऐवजी सर्वानी ईश्वर एक आहे हे मानून विश्व बंधुत्त्वाचा विचार करावा जसे की, इस्लाम मानतो असे सांगितले. मुसलमान स्वतः ला मुसलमान म्हणवतो किंवा त्याचे विशिष्ठ नांव आहे म्हणून मुसलमान होत नाही. जी व्यक्ती आपली कर्मे ईश्वराच्या अर्पण करते तीच व्यक्ती मुसलमान असू शकते. म्हणून दंगे, खून करणारे मुसलमान असूच शकत नाहीत. आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना आपण सांगितले की, भारतात राहणारा मुसलमान हिंदू असू शकतो. कारण हिंदुचा अर्थच सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारा असा आहे. म्हणून भौगोलिक दृष्ट्या भारतातील सर्व मुसलमान हिंदू आहेत. मूर्ती पूजा करणारे मात्र मुसलमान होऊ शकत नाहीत. मूलतत्त्ववादी होणे आवश्यक आहे. डॉक्टर वगैरेंची उदाहरणे देऊन मूलतत्त्ववाद गरजेचा आहे असे सांगितले. एकाला जे आतंकवादी वाटतात ते दुसऱ्याला हितवादी वाटतात. त्या करता पोलीस व स्वातंत्र्याकरता लढणाऱ्यांची उदाहरणे दिली. आपल्याला प्रश्न विचारला. धर्मामुळे बंधुभाव वाढण्या ऐवजी लढाया का होतात? आपल्या मते सर्व धर्मियांनी आपापल्या धर्माचा अभ्यास करावा व त्यातील समान गुणांची प्रथम जोपासना करावी. जे मुद्दे विरोधी वाटतात त्या वर नंतर विचार करावा. आपण स्वतः तेच करतो म्हणून सांगितले. त्याचे दाखले दिले. दुसऱ्या एका प्रश्नावर आपण सांगितले की, इस्लामचा प्रसार तलवारीच्या जोरावर झाला नाही. त्या करता इंडोनेशियाचे उदाहरण दिले. आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, निरनिराळ्या धर्मियांनी एकत्र येऊन समान नियमांचा विचार करावा. जेथे साम्य नसेल ते सध्या सोडून द्यावे. एकमेकावर टीका करू नये. आपण हेच करता असे कबूल केले. हा विचार मला सर्वोत्कृष्ठ, सर्वमान्य, अप्रतिम वाटला. राजकारणात भारतामध्ये व इतर अनेक देशात हेच होत आहे व त्यामुळे शासन चालू आहे. एका शिक्षकांनी प्रश्न विचारला. विश्वबंधुत्त्वा करता प्राधान्य धर्माला, समाजशास्त्राला की शासनाला? आपल्या मताप्रमाणे धर्माला. दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की जरी सर्व धर्मांची शिकवण एकच असली तरी इस्लाम मध्ये गुन्हे रोखण्याचा व होऊ न देण्याचा प्रबंध आहे. प्रत्येक गुन्हा व त्या करता शिक्षा तसेच जकातीची व्यवस्था आहे. म्हणून इस्लाम विश्वबंधुत्त्वाकरता जादा योग्य आहे. या करता अमेरिकेतील उदाहरणे देऊन आपले मनोगत व्यक्त केले की, तेथे शरीयत मधील कायदे लागू केले तर बलात्कार, खून, मारामाऱ्या, चोऱ्या होणार नाहीत. आपण अनेक हवाले देऊन असेही आपले म्हणणे मांडले. ब्रह्मचार्याला इस्लाम मध्ये स्थान नाही. प्रत्येक तरुणाने लग्न केलेच पाहिजे असे इस्लाम शिकवतो. आपल्या विद्वत्ता प्रचुर भाषणाच्या समारोपात सांगितले की. जगातले सर्व धर्म त्या त्या धर्मिया करता आहेत. फक्त इस्लाम धर्म असा आहे की तो सर्वा करता आहे. फक्त इस्लाम मध्ये जिवंत पणी ईश्वराची सेवा करता येते व त्याचे जिवंत पणी फळ मिळते. बाकी धर्म मृत्यू नंतर फळ मिळेल असे सांगतात. मला समजलेले मुद्दे मी थोडक्यात मी वर उद्धृत केले आहेत.
कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी समारंभाचे औचित्त्य राखीत अॅडव्होकेट हेगडे यानी कबूल केले की, त्यांनी हिंदू असून कोठलेही हिंदुंचे ग्रंथ वाचले नाहीत. व्यााख्याते एक इस्लामचे विद्वान असून त्यानी नैसर्गिक रित्या इस्लाम बद्दल परिपूर्ण माहिती दिली. फक्त इस्लाम मध्येच शिक्षेची तरतूद आहे हे मान्य केले. तसेच भारतामध्ये प्रथम इंग्रजा विरुद्ध स्वराज्याकरता लढाई मुसलमानानी केली. अॅडव्होकेट हिंगोरानी यानीही असेच विचार मांडले. हिंदू धर्माला नांव बाहेरून आलेल्या लोकानी दिले. शिव जसा स्वयंभू आहे तसेच खुदा ही आई वडिला विना आहे. समारोपा मध्ये दोन्ही वक्त्यानी डॉ. झाकीर नाईक याना धन्यवाद दिले व प्रसंगाचे अवधान राखून डॉक्टरांची प्रशंसा केली.
वर दिल्या प्रमाणे मला समजले ते लिहले आहे. मी या भाषणाने प्रभावित नक्कीच झालो. त्याच बरोबर विज्ञानाच्या (Science) दृष्टिकोनातून माझ्या मनात खूप शंका निर्माण झाल्या. त्या खाली मी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे आपण शांत पणे वाचून, समजून घेऊन मनन करून शंका समाधान कराल. जी काही सत्यता आपल्याला खात्री लायक वाटेल तिचा आपल्या पुढील भाषणात समावेश कराल.
प्रथम विचार 'भाईचारा' बंधुभाव याचा. आपल्याला बंधुभावाची आवश्यकता आहे का? व असलीच ती का आहे? प्रत्येक मनुष्याला जिवंत राहावे असे वाटते. मरण कोणालाच आवडत नाही. मनुष्यालाच काय प्रत्येक प्राण्याची हीच इच्छा आहे. मला एक गोष्ट आठवते. ती खरी खोटी हा मुद्दा महत्त्वाचा नाही. त्या गोष्टीतील आशय महत्त्वाचा आहे. एका मुनीना पुढील जन्मात डुक्कराच्या योनीत जन्म होणार असे माहिती झाले. मरणा अगोदर त्यानी आपल्या एका शिष्याला बोलावून सांगितले की, माझा पुढील जन्म अमुक एका डुक्करीणीच्या पोटी होईल व माझ्या माथ्यावर पांढरा ठिपका असेल. मी जन्मल्या बरोबर मला शोधून माझी हत्त्या कर. या प्रकारे डुक्कराचे जीवन मला जगावे लागणार नाही. शिष्याने आज्ञे प्रमाणे शोध घेऊन डुक्कराला मारण्या करता दगड उचलला. परंतु त्याला गुरूचा आवाज ऐकू आला. तो आवाज सांगत होता माझा जीव घेऊ नको. मला जगायचे आहे. या गोष्टीचा मतितार्थ जीवन हे सर्वाना प्रिय आहे. जगणे म्हणजे त्या करता अन्न पाणी व इतर गरजेच्या वस्तू बरोबर शत्रू पासून संरक्षण आवश्यक आहे. किंबहुना संरक्षणाचा मुद्दा प्राथमिकता देण्यालायक आहे. स्वसंरक्षणा करता शक्तीची नितांत गरज आहे. ही शक्ती शरीर सार्मथ्य वाढवून, शस्त्रांचा उपयोग करून, युक्तीचा उपयोग करून नक्कीच वाढवता येते. परंतु या सर्वाना बंधने आहेत. त्या पलीकडे जाता येत नाही. दुसरा खात्रीशीर उपाय म्हणजे दुसऱ्याची शक्ती आपल्यात मिळवणे. हे साधे बेरजेचे गणित आहे. मुंगी पासून हत्ती पर्यंत सर्व प्राणी सुद्धा हेच करतात. दुसरे जितके जास्त तेवढी शक्ती जास्त. यातूनच बंधुभाव या कल्पनेचा उदय झाला असावा. कोठल्याही कुटुंबा मध्ये तरुण मुलाना जर एकत्र ठेवले तर त्या कुटुंबाची शक्ती नक्कीच कोणा एका पेक्षा जास्त असेल. भावा भावातील एकी, एकावर संकट आले तर बाकी सर्व स्वतःवर संकट आले समजून त्या वर मात करण्याची सर्वांची प्रबळ इच्छा हा या कल्पनेचा पाया. (मुलाला मुली पेक्षा प्राथमिकता देण्याची वृत्ती यातूनच निर्माण झाली असावी. बंधुभाव हा शब्दही या मुळेच वापरात आला असावा.) या कल्पनेचा प्रसार शेजाऱ्याशी मैत्री, गांवातील सर्वाशी मैत्री असा होत त्यातूनच विश्वबंधुत्त्वाची कल्पना पुढे आली असावी. हे माझे तर्कशास्त्र आहे. हे ग्रंथामध्ये दिलेले असेलही. परंतु, मी कोठलाही दावा करणार नाही. माझ्या बुद्धी प्रमाणे मला तर्क लढवून जे दिसते ते असे आहे. माझा तर्क सांगतो बंधुभाव आवश्यक आहे. माणसा माणसा मधील ऐक्य गरजेचे आहे. मनुष्याने मनुष्याला मारणे बंद केले तर मनुष्य जात पृथ्वी तलावर टिकण्याची शक्यता जास्त आहे.
कोठलीही प्रणाली टिकण्या करता नियम आवश्यक आहेत. तसेंच ते नियम सवांर्नी पाळणे गरजेचे आहेत. सर्वाना समान वागणूक मिळत असेल, सर्वांच्या आवश्यकता पूर्ण होत असतील, सर्वांच्या इच्छा ठराविक मर्यादेत सफळ होत असतील तर अशी मैत्री टिकून राहू शकते. एखाद्या व्यक्तीला ती वर अन्याय झाला असे वाटले तर ती व्यक्ती इतरा पासून दूर जाण्याची शक्यता बळावते. यातून धर्म ही संकल्पना उदयास आली असावी. सुरवातीला धर्माला नांव देण्याची आवश्यकताच नव्हती. आताही खरे पाहिले तर धर्माला नांव देण्याची गरज नाही. धर्माची आवश्यकता समूह एकत्र ठेवण्या करता आहे. आपल्या समुहाचे नियम पाळणे म्हणजेच धर्म. फार तर त्या समुहाचे नांव धर्माला देता येईल.
धर्म हा दोन पायावर आधारित आहे. एक पाय तत्त्व व दुसरा उपासना. महर्षि व्यासानी धर्म तत्त्वाची सुटसुटीत व्याख्या सांगितली आहे. 'परोपकाराय पुण्याय। पापाय परपीडनम्।' समूह एकत्रित ठेवण्या करता प्रत्येकाने हे तत्त्व आचरणात आणले पाहिजे. हाच धर्म होय. ही व्याख्या सुटसुटीत तरीही पूर्ण आहे. हे तत्त्व कालाधीत आहे. या मध्ये कधीही बदल करण्याची गरज नाही. परंतु, सामान्य लोकाना रोजच्या जीवनात आचरण करताना निरनिराळ्या परिस्थितीत काय करावे या बद्दल कधी कधी संभ्रम निर्माण होतो. त्या वर उपाय किंवा नक्की काय करावे या बद्दल सामान्य जनाना ज्ञानी व्यक्त्तीच मदत करू शकते. ज्ञानी व्यक्ती सभोवालच्या परिस्थितीनुसार मूळ गाभा ध्यानात ठेऊन उपाय सांगतात. हा उपाय मात्र भौगोलिक परिस्थिती, काळ व समाज या वर अवलंबून असतो. हा उपाय त्रिकालाबाधित सत्य असेलच असे नाही. आजचा उपाय उद्या पाप म्हणूनही गणले जावू शकते. या करता थोर शास्त्रज्ञ न्यूटन यांचे उदाहरण घेऊ. त्यांच्या काळी उपलब्ध ज्ञान व अनुभव यातून तीन नियम मांडले. ते पूर्ण सत्य म्हणून कित्येक वर्षे त्यांच्या काळातील व नंतरच्या शास्त्रज्ञानी मानले. परंतु, आइन्स्टाईनला चौथा अक्ष असावा असे वाटले. या अक्षाच्या साह्याने पदार्थांची वर्तवणूक काटेकोर पणे सांगता येईल अशी खात्री वाटू लागली. त्यानी प्रयोग केले व पूर्ण खात्री झाल्यावर इतरानाही सांगितले. आइन्स्टाईनचा उद्देश न्यूटनला खोटे ठरवण्याचा नक्कीच नसावा. त्याचा उद्देश सत्याची जास्तीत जास्त जाणिव करून घेण्याचाच होता. दोघानाही पक्के माहीत होते की, तो केवळ शिडीचा पायंडा (पायरी) आहेत, शिडी नव्हे. त्यांच्या पायंड्याचा उपयोग करून इतर वर जातील, जर त्यांच्यात कर्तृत्त्व असेल तर पायंडा बनतील.
आईन्स्टाईनच्या शोधामुळे त्याला कोणी न्यूटन पेक्षा थोर ठरवले नाही, किंवा न्यूटनला मोडीत काढले नाही. दोघानाही समान महत्तता दिली. याच प्रमाणे समुह एकत्रित राखण्या करता निरनिराळ्या ज्ञानी मनुष्यांनी आपापल्या काळामध्ये भोगोलिक परिस्थितीनुसार त्या वेळच्या समाजासाठी आचरणाचे नियम बनवले. जेंव्हा हे नियम बनवले तेंव्हा त्या क्षेत्रातील समाजा करता ते नियम उत्तम होते. नियमात दिसणारा फरक या तीन कारणा मुळेच दिसतो. याचा दुसरा अर्थ असा की, नियम कधीही शाश्वत असू शकत नाहीत. असे असले तरी निरनिराळ्या काळात ज्ञानी मनुष्यानी बनवलेल्या कोठल्याही नियमाला केंव्हाही हीन लेखता येत नाही. जेंव्हा नियम बनवला, ज्या क्षेत्रा करता बनवला व ज्यांच्या करता बनवला तेंव्हा तो श्रेष्ठच होता. नियमातील चूक ही केवळ वरील तीन कारणा मुळे वाटते. या करता असंख्य उदाहरणे देता येतील.
अन्न शाकाहारी श्रेष्ठ का मांसाहारी या बद्दल वाद घालण्या आधी कोेणाला कोठले अन्न उपलब्ध आहे याचा विचार करावा. वाळवंटा मध्ये गवत सुद्धा उगवत नाही. त्याना शाकाहाराचे महत्त्व पटवण्यात कोठला शहाणपणा? जेथे प्यायला पाणी मिळत नाही तेथील लोकाना दिवसातून तीन वेळा आंघोळ करण्याचा नियम कोणी शहाणा सांगेल काय? सिंधुच्या काठा वरील मनुष्याला तांब्याभर पाण्यात अंंघोळ करण्याला सांगितले असते काय? दाट झाडीत राहणाऱ्याला वाळूत प्रेत पुरण्याचा नियम लागू केला असता काय? जेथे स्त्री-पुरुष गुणोत्तर एकच्या जवळपास आहे तेथे एका पेक्षा जास्त बायका करण्याचा नियम राबवला असता काय? दगडात सुद्धा ईश्वर आहे असे मानून दगडाची पूजा करणाऱ्याना मूर्ती पूजा चुकीची आहे असे सांगणे खरे आहे काय? जेथे स्त्रीलालसे मुळे खून मारामाऱ्या होतात तेथे स्त्रीला बुरख्यात ठेवले तर काय बिघडते? कोणी म्हणेल अमुक ग्रंथात सूर्याला अर्ध्य दिल्या शिवाय पाणी सुद्धा पिऊ नका असा नियम सांगतो म्हणून उत्तर ध्रुव प्रदेशातही मी तो नियम पाळेन, तर त्याला आपण कोठला शहाणा म्हणून ओळखू? कोणी म्हणाले की, मी बँकेतील पैशावर व्याज घेणार नाही तर त्याला आपण कोठे पाठवू? नियम म्हणजे धर्म नव्हे. नियम समाजोपयोगी आचरण कसे करावे याची शिकवण आहेत. निरनिराळ्या ग्रंथामुळे निरनिराळे धर्म होत नाहीत. धर्म एकच असतो, धर्माला एकच असल्यामुळे वेगळी वेगळी नांवे देण्याची आवश्यकताच नाही. धर्माला फक्त धर्मच म्हणले पाहिजे. तरी पण कोणाला धर्माला नांव द्यायचेच असेल तर ते नियमांच्या अनुषंगाने (किंवा आधारित) असावे. उदाहरणार्थ पित्याने अपत्या बाबत पाळावयाचे नियम म्हणजे पितृधर्म, भावाचे इतर भाऊ-बहिणी बद्दलची कर्तव्ये म्हणजे भातृधर्म, कुटुंब धर्म, शेजारधर्म, गल्ली धर्म, गांवधर्म, तालुका धर्म, जिल्हाधर्म, राज्य धर्म, देश (राष्ट्र) धर्म, जगधर्म, विश्वधर्म वगैरे.
ज्ञानी व्यक्ती जेंव्हा जेंव्हा समाजाला गरज भासेल तेंव्हा तेंव्हा घडल्या जातात. भारता मध्येच काय सर्व जगभर हीच भावना आहे. गीतेतील 'संभवामी युगेयुगे' काय किंवा 'येशू दर दोन हजार वर्षानी अवतरतो' काय, याचा अर्थ एकच. जेंव्हा जेंव्हा समाजात अपप्रवृत्ती बळावतात तेंव्हा तेंव्हा समाज सुधारक घडले जातात. सर्वसामान्य जनाना तो ईश्वराचा अवतार किंवा ईश्वराचा एकुलता एक पुत्र किंवा ईश्वराचा प्रेषित वाटतो. क्षेत्र, काळ व समाज यांचा विचार करून तो नियम बनवतो व त्यातून शांतता स्थापीत करतो, समाजाचे रक्षण करतो, मनुष्य जात नामशेष होऊ देत नाही. अशी व्यक्ती जेंव्हा घडत नाही तेंव्हा युद्धे होतात, नाश होतो व त्यातून संघ भावना निर्माण होते व राहिलेल्या लोकाना नाश पाहिल्या मुळे शहाणपण सुचते. युद्धाची आठवण असे पर्यंत शांतता राहते.
कोठलाही नियम पाळला जातो तेंव्हाच त्याचा उपयोग होतो. नुसते चांगले नियम बनवून भागत नाही. नियम बनवणाराना याची पूर्ण कल्पना होती. त्या करता त्यानी व्यवस्थापनातील श्रेष्ठ सूत्राचा उपयोग केला. त्यानी, पोलीस व न्यायाधीश प्रत्येकाच्या मनात बसवले. त्याला विश्वाचा निर्माता मानले. हा शोध ज्याने लावला त्याला नोबेल पारितोषिक जर दिले तर तो पारितोषकाचा सन्मान होईल, शोधर्कत्याचा नव्हे. विश्व निर्मात्याला निरनिराळ्या प्रदेशात निरनिराळ्या काल खंडात निरनिराळी नांवे दिली. कोण ईश्वर या नांवाने ओळखतो, तर कोणी गॉड, तर कोणी खुदा. आणखीही कित्येक नांवाने जगभरात त्याला ओळखले जाते. विश्व निर्माता असल्याने त्याला आई वडील असण्याची आवश्यकता नाही. तो सर्वत्र वास करत असल्याने त्याला घराची गरज नाही. त्याने सर्व सजीव तसेच निर्जीव निर्माण केले असल्याने त्याला आकार नाही. अगदी निर्गुण व निराकार परंतु सर्वशक्तिमान. ईश्वर असा असल्यामुळे त्याच्या बद्दल भीतीयुक्त्त आदर सर्वांच्या मनात निर्माण केला. भीती या करता की, 'प्रत्येकाची ठाम समजूत असावी की मी नियम मोडला तर ईश्वराला लगेच माहिती होईल व मला शिक्षा मिळेल'. आदर या करता की, 'मी नियमांचे पालन केले तर ईश्वर माझ्या इच्छा पूर्ण करेल'. या प्रकारे कमीत कमी खर्चात नियमांचे पालन होण्याची शक्यता निर्माण केली. (खरोखरच हे व्यवस्थापन अद्वितीय आहे. ही एक उत्तम गोष्ट जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी निरनिराळ्या काळी एकाच प्रकारची झाली. समाज शास्त्रज्ञ, इतिहासकार, व्यवस्थापन तज्ञ संगणक तज्ञ वगैरेनी या वर जरूर संशोधन करावे व या प्रकारची सद्यः स्थितीत वापरता येईल अशी व्यवस्थापन यंत्रणा निर्माण करण्यास हातभार लावावा.) तसे पाहिले तर ईश्वराला नांव असण्याची आवश्यकता नाही. तरी पण निरनिराळ्या प्रदेशात, वेगवेगळ्या समाजाने ईश्वराला एका पेक्षा जास्त नांवे दिली. अर्थात त्या बद्दल कोणीही आक्षेप घेऊ नये.
भारता मध्ये तेहतीस कोटी देव मानले जातात. त्याला दोन कारणे संभवतात. पहिले कारण भारत हा एक विशाल देश आहे. प्राचीन काळी दळण वळणाच्या वेगवान सुविधा नव्हत्या. त्यामुळे भौगोलिक सुविधेनुसार छोटे छोटे समाज आपल्या करता सामाजिक वर्तनाचे नियम बनवत असावेत. या नियमाना ते आपआपला धर्म मानीत असावेत. प्रत्येक समाजाने त्यांच्या बोली भाषेत ईश्वराला नांव दिले असावे. तद् नंतर जसजशी दळणवळणाची साधने विकसित झाली तसतसे सर्व समाजानी दुसऱ्या समाजातील ईश्वराच्या नांवाला मान्यता दिली. दुसरे कारण नक्कीच विश्वसनीय आहे. भारतात जरी अनेक समाज व प्रत्येक समाजाचा धर्म वेगळ्या नांवाने असला तरी मूल तत्त्व महर्षी व्यासानी सांगितल्या प्रमाणेच होते. सर्वांची धारणा होती की, सजीव व निर्जीव चार प्रकारात मोडतात. हे प्रकार त्यांच्या कर्मावर आधारित आहेत. ते असे,
· जो स्वतः नुकसान सोसून सुद्धा दुसऱ्याच्या फायद्याला प्राधान्य देतो. त्याला देव हे नांव दिले.
· जो दुसऱ्याच्या हिता करता झटतो परंतु, त्या करता स्वतःचे नुकसान होऊ देण्याची त्याची तयारी नसते. त्याला मानव असे संबोधले गेले.
· जो दुसऱ्याचे नेहमी अहितच इच्छितो परंतु त्या करता स्वतःचे नुकसान होऊ देत नाही तो दानव.
· जो दुसऱ्याचे नेहमी अहितच इच्छितो व त्या करता स्वतः संकटात पडण्याची ज्याची तयारी असते त्याला राक्षस म्हणण्यात आले.
वरील व्याख्येप्रमाणे जो कोणी माझ्या हिता करता स्वतः कष्ट करतो त्याला मी देव मानणारच. माझे आई वडील जर स्वतःच्या इच्छा मारून माझे लाड पुरवत असतील तर त्याना मी देव का मानू नये? स्वतः जळून मला प्रकाश देणाऱ्या सूर्याला देव म्हणायचे नाही तर काय राक्षस म्हणायचे? दूध, खत, औषधी मूत्र देणारी गाय देव पणात कोठे कमी आहे? भौगोलिक दिशा दर्शक शंकराच्या पिंडीला वाट चुकलेला मनुष्य देवच मानेल. स्वतः ऊन, पाऊस व वाऱ्याचा मारा सहन करून माझे रक्षण करणाऱ्या झाडाला मी देवच मानीन. जगामध्ये अशा कित्येक गोष्टी आहेत त्या स्वतःच्या नुकसानीची पर्वा न करता मनुष्याचे भले करतात त्या सर्वाना देव संबोधले तर त्यात काय चुकले? ज्या दिशा दर्शक व ज्ञानी कर्तृत्ववान व्यक्ती होऊन गेल्या त्याना देवपण दिल्याने मनुष्याची किंवा ईश्वराची मानहानी होते काय? ईश्वर एक आहे परंतु, देव अनेक आहेत. देवांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. अर्थात कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे त्यांच्या प्रतिमेला फुलांचा हार घालणे अगर मंदिर बांधणे नव्हे, हे मी पक्के जाणून आहे. कृतज्ञता व्यक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांचे डोळसपणे अनुकरण करणे.
राम, कृष्ण, महावीर, गौतम बुद्ध, येशु, पैगंबर, महात्मा गांधी या व या सारखी अनेक व्यक्तीमत्वे होऊन गेली. त्यानी नुसत्या ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या नाहीत तर आचरणात आणल्या. त्या मध्ये त्यांचा वैयक्तिक फायदा नव्हता. त्यानी जे केले ते प्रसंगी स्वतः दुःख सोसुन समाज्याच्या भल्या करता केले. वनवास, पत्निचा त्याग, समाज शत्रूंचा नाश, राज्य त्याग, संन्यास, सामान्य जनांच्या हिता करता राक्षसी वृत्तीच्या लोकाशी शत्रुत्त्व, मक्केहून मदिनेला पलायन, मरणांतिक उपोषणे वगैरे ज्यानी केले त्यांची शिकवण मात्र सध्या जवळ जवळ सर्वच विसरले आहेत. उदाहरणार्थ महात्मा गांधींचे विचार पाहू. महात्म्यानी सांगितले खेड्यात चला. त्या वेळी 80 टक्क्यापेक्षा जास्त जनता खेड्यात राहत असे. त्यांचे जीवन सुरक्षित व आत्म सन्मान पूर्ण करणे त्याना अभिप्रेत होते. परंतु आपण काय केले? निवडणुकीच्या सुगी मध्ये खेड्यात चकरा मारल्या, भरपूर आश्वासने दिली, मते मिळवली. निवडून आलो व नंतर पुढील निवडणुकी पर्यंत खेड्याचे तोंडही पाहिले नाही. खेडी थोडी बहुत सुधारली पण त्याचे श्रेय आम्हाला नाही. जे झाले ते काही थोड्या समाजसुधारकामुळे झाले. गांधीजीनी चरखा वापरण्यास सांगितला. त्या मागचे तत्त्व लक्षात न घेता आपण खादी ग्रामोद्योग स्थापला व कोट्यावधी रुपये अक्षरशः पाण्यात घालवले. खेड्यात कारखानदारी नेली असती तर प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण झाले असते. झोपडपट्टीचा प्रश्नच उद्भवला नसता. गांधीजीनी मिठाकरता सत्याग्रह केला. आपण त्याच मिठावर कर बसवून लोकानी न खावे याचा बंदोबस्त केला. सोन्याच्या किंमती ऐंशी पट तर मिठाच्या दोनशे पट. अशा प्रकारे आपण ग्रंथातील अक्षरावर बोट ठेऊन मूलतत्त्वांचा नाश केला मग ती धर्माची असोत किंवा अर्थकारणाची किंवा इतर कोठलीही.
प्रेम, श्रद्धा, विश्वास व भीति या भावनांचा उपयोग करून उपासना हा समाजातील प्रत्येक व्यक्तीची ईश्वरावर श्रद्धा वाढवण्या करता ज्ञानी व्यक्तीनी शोधलेला मार्ग होय. आहे. ईश्वर जर सतत मनात राहिला तर दुष्कृत्ये करण्याकडे मनुष्याचा कल नक्कीच कमी होईल. प्रेम ही भावना मनुष्यालाच काय परंतु पशुना सुद्धा ज्या वर प्रेम आहे त्या करता जीव सुद्धा देण्यासाठी तयार करते. तो किंवा ती आपले नेेहमीच हित सांभाळेल अशा भावनेने श्रद्धा वाढते. ज्याची ताकद आपल्या शत्रू पेक्षा जास्त असते व आपणाला नेहमीच मदत करेल अशी श्रद्धा ज्यावर असते त्यावर प्रत्येक जण विश्वास ठेवतो. भीति ही मनुष्याला कुकर्म करण्यापासून रोखते. असा भावनांचा उपयोग करून मनुष्यावर नियंत्रण मिळवण्यात ज्ञानी लोक सफल झाले. व्यवस्थापनाचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे.
उपासनेची सुरवात ईश्वराच्या नामस्मरणाने झाली असावी. त्याच्या पुढील पायरी म्हणजे मनुष्याची सत्कर्मे देवाच्या चरणी अर्पण करणे. त्यातूनच दुष्कर्मे करण्याच्या वृत्तीचा नाश होत असावा. कोठलेही कृत्य अगोदर मनात जन्माला येते. मनुष्याच्या मनात आलेले विचार तो (ती) प्रत्यक्षात उतरण्याचा प्रयत्न करतो (ते). मनात जर वाईट विचाराना थारा दिला नाही तर सत्कर्मे करण्याचा मार्ग सुकर होतो. मनात नेहमी समाजोपयोगी विचारच यावेत या करता वातावरण निर्मिती आवश्यक आहे. शांतता, मधुर वास, पुरेसा उजेड, आल्हाददायक दृश्ये या मुळे चांगली वातावरण निर्मिती होते. यातूनच फुले, धूप, संगीत, दिवे यांचा उपयोग होत असावा. लक्ष केंद्रित करण्या करता ईश्वराच्या प्रतिकाची गरज सुद्धा उपासना सुकर करण्याच्या उद्देशानेच भासली असावी.
या चांगल्या विचाराची काळाच्या वेगात विटंबना होत राहिली. मनुष्य तत्त्वा ऐवजी उपचाराना महत्त्व देऊ लागला. ईश्वर व मनुष्य या मध्ये मध्यस्त निर्माण झाले. मध्यस्त स्वार्था पोटी इतराना जवळचे मार्ग दाखवू लागले. पूजा आम्ही करतो, तुम्ही फक्त पैसे द्या. पूजेच्या साहित्या करता पैसे द्या. ईश्वरा जवळ मागा, तो तुम्हाला सर्व कांही देईल. त्या करता नवस करा, दक्षिणा द्या, दान करा, मंदिरे बांधा, मंदिरा करता पैसे द्या, मंदिराना जमीनी द्या वगैरे आणि कितीतरी दुसरे मार्ग मध्यस्थानी सुचवले व ते सर्वसाधारण माणसाने भिती पोटी मान्य केले. अशी काळाच्या ओघात उपासनेची विटंबना होत गेली असावी.
तत्कालीन ज्ञानी लोकाना चूक उमगली व त्यावर त्यांनी उपाय सुचवले. काही माणसांना ते पटले व ते त्यांचे अनुयायी झाले. सुरवातीच्या काळात सर्वच ज्ञानी लोकांचे ऐकत. परंतु नंतरच्या काळात ऐकणारे व न ऐकणारे असे तट पडले. जसे बिलिव्हर-नॉनबिलिव्हर, मोमीन-काफीर वगैरे. काही प्रदेशात ज्ञानी लोकानी सांघिकता कशी महत्त्वाची आहे हे सांगितले, तत्त्वे विशद करून सांगितली. जीवनाचा अर्थ पटवून दिला. ज्यानी ऐकले त्याना आणखी सांगितले, ज्यांनी ऐकले नाही त्यांचे वाईट चिंतले नाही. जे काही झाले त्या मुळे एक मोठा फरक जाणवला. धमांर्ला नांव मिळाले व मनुष्य धर्माचा मूलभूत उद्देश विसरून गेला. नियम नेहमीच काळ, प्रदेश व समाज याना बांधील असतात हेच विसरला. भौगोलिक सत्यता नाकारून धार्मिक नियमाना जास्त महत्त्व देऊ लागला. कोठल्याही समस्येचे उत्तर पुस्तकात शोधू लागले. समाजाची संख्या वाढवण्या ऐवजी धर्मांतील लोकांची संख्या वाढवू लागले. स्वेच्छेने धर्मांतर केले तर ठीक नाही तर प्रलोभने दाखवून, अत्याचार करून धर्मांतर करू लागले. एकाच भौगोलिक प्रदेशातील एक धर्मीय दुसऱ्या धर्मियाना शत्रू समजू लागले. अंधश्रद्धा वाढली, नवसाला महत्त्व दिले जाऊ लागले, ईश्वराला कर्म वाहण्या ऐवजी सोने, पैसे, अर्पण करू लागले म्हणजेच ईश्वराला सुद्धा लाच देऊ लागले, एखाद्या ठिकाणाला पवित्र मानून तेथे पुण्य मिळवण्याच्या आशेने जाऊ लागले. आणि सध्याच्या युगात लोकसंख्या नियंत्रणाची आवश्यकता असताना भरपूर मुलाना जन्म द्या असे आग्रहाने सांगू लागले. अशा प्रकारे उपासनेला विकृत रूप प्राप्त झाले व त्यातूनच धर्माचा ऱ्हास झाला.
या प्रस्तावने नंतर आपण सांगितलेल्या मुद्या बाबत माझी मते मांडतो. आशा आहे ती फक्त वाचून नव्हे तर त्यांचे मनन करून आपण मला योग्य काय आहे या बाबत माझे प्रबोधन कराल.
डार्विनच्या सिद्धांता प्रमाणे काळाच्या ओघात सजीव निर्माण झाला व त्याला आवश्यकतेप्रमाणे निरनिराळे अवयव प्राप्त झाले. सर्व प्रथम सजीव पाण्यातच निर्माण झाला असावा. तद् नंतर त्याचा विकास होत सध्या अस्तित्व असलेले व नष्ट झालेले सजीव निर्माण झाले असावेत. मत्सावतार, कूर्मावतार, वराहअवतार, नृसिंहअवतार, परशुरामावतार, रामावतार, कृष्णावतार व कलंकीअवतार असे भारतात मानण्यात आलेले अवतार हेच दर्शवतात. तेंव्हा पहिला सजीव हा अमीबाच असावा. त्याला ना आई होती ना वडील. तर मग त्याला आपण काय म्हणाल? माझ्या मते ईश्वराची भारतात प्राचीन काळापासून मान्यता प्राप्त संकल्पना जास्त योग्य वाटते. ती विज्ञानाला सुद्धा मान्य होईल. ऊर्जेला ईश्वर मानण्यास हरकत नसावी. थर्मोडायनॅमिक्सच्या नियमा प्रमाणे, ऊर्जेला ना जन्म ना मरण म्हणजे ऊर्जा ना उत्पन्न करता येते ना नष्ट करता येते. ऊर्जा निर्गुण व निराकार आहे. ऊर्जेचे नियम बांधील आहेत, ते कोणीही बदलू शकत नाही. या नियमानुसार फल प्राप्ती होते. पूर्वी होत होती, आता होते व भविष्यातही होत राहील. माझ्या मते ऊर्जा म्हणजेच ईश्वर. ऊर्जा एकच आहे तेंव्हा दुसरा किंवा दुसरे ईश्वर असण्याचा(ची) प्रश्नच येत नाही. मात्र देव अनेक असू शकतात. या बद्दल मी वर स्पष्टीकरण दिलेले आहे.
एका प्रश्नाच्या उत्तरात मूलतत्त्ववाद चांगला आहे हे पटवून दिले. माझेही तेच मत आहे. मी तर म्हणेन मूलतत्त्ववाद अत्यंत आवश्यक आहे. त्या करता धर्माचे मूलतत्त्व कोणते या बद्दल एकमत झाले पाहिजे. एकमेव मूलतत्त्व की ज्यामुळे धर्माची आवश्यकता भासली व जे सर्व तथा कथित धर्मा मध्ये मान्य आहे ते म्हणजे आधी उधृत केलेले व्यासांचे वचन. 'परोपकाराय पुण्याय। पापाय परपीडनम्।' धर्म नियम, उपासना, चालीरिती, परंपरा ही काही मूलतत्त्वे नव्हेत. वैश्विक सत्य म्हणजे व्यासांचे वचन. प्रत्येक मनुष्याने हे मूलत्त्व मानून प्रत्येक मनुष्य मूलतत्त्व वादी झाला तर भांडणाचे कारणच उरणार नाही.
इस्लाम बद्दल आपला अभिमान सार्थ आहे. इस्लाम मुळेच पश्चिम आशियात 1400 वर्षा पूर्वी शांतता निर्माण झाली. तेथील मनुष्य वंश नष्ट होण्या पासून वाचला. तसेच इतरत्रही निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या समयी झाले. म्हणजेच जेथे जरूर पडली तेथे त्या वर ज्ञानी लोकानी उपाय केले. परंतु, याचा अर्थ हे उपाय शाश्वत आहेत असे कसे म्हणता येईल? तलवारी वरील उपाय जुन्या ग्रंथात सापडू शकतील. अणुबाँब वरील सापडतील काय? ज्ञानाचा उपयोग करून कोणी वेगळा उपाय (जो धर्मग्रंथात दिलेला नाही) शोधून काढला म्हणून त्याचे वर्तन धर्माला अपमानकारक होईल काय? अशा प्रकारे समाज नियम, परंपरा, रूढी, चालीरिती, उपासना या मध्ये बदल झाले तर ते धर्म विरोधी कसे होतील?
इस्लाम धर्मात कायदे आहेत. हे कायदे करताना दोन्ही बाबींचा पूर्ण विचार केलेला आहे. गुन्हा होऊ नये म्हणूनही व गुन्हा झालाच तर जरब बसावी म्हणूनही. परंतु, हे तत्त्व प्रत्येक देशाच्या कायद्या मध्ये दृष्टीला पडते. काळ व प्रदेशा प्रमाणे प्राप्तीकर (जकात) सगळीकडेच आकारला जातो. बलात्काराला शिक्षा होतेच. मी तर म्हणेन बलात्काराला फाशीची शिक्षा सौम्य आहे. त्या करता लिंग बदल ही शिक्षा द्यावी. 1400 वर्षा पूर्वी ही शिक्षा शक्य नव्हती. परंतु आता सहज शक्य आहे. इस्लाम मध्ये सर्व समस्येवर तोडगे आहेत हे म्हणणे धाष्टर््याचे होईल. उदारणार्थ, स्त्रीभ्रृण हत्त्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नोकरी, कापसाचा भाव, प्रदूषण नियंत्रण, पाणी, रस्ते, वीज, बाँब स्फोट, बंगलादेशी नागरिक, अणुबाँब, या व अशा आजच्या समस्या वर कोठल्या ग्रंथामध्ये उपाय सापडतील? या वरून ग्रंथा मधील ज्ञान पूर्ण आहे हे कसे मानावे? कालानुरूप बदल होणारच. नवे प्रश्न नवी उत्तरे शोधावीच लागतील. सध्याच्या परिस्थितीत स्त्रीभ्रूण हत्त्येवर प्रभावी उपाय म्हणजे स्त्री व पुरुष याना एकच धार्मिक, सामाजिक, आर्थिक हक्क व जबाबदाऱ्या प्रदान करणे. जर स्त्री वंशाचा दिवा प्रकाशित ठेवत असेल, सर्व धर्म विधी करू शकत असेल व वार्धक्यात आई वडलांची जबाबदारी घेऊ शकत असेल तर गर्भाशयातील मुलीला कोण मारील. मला वाटते नांवाची पद्धत बदलावी. प्रथम नांव अर्थातच मुलाचे (मुलीचे) मधले नांव आईचे व शेवटचे नांव वडलांचे. वंशाचा दिवा वगैरे संकल्पना मोडीत निघतील. असे केले तर स्त्री भ्रूण हत्त्या कोणी करण्याची शक्यता नाही. सर्व धर्माच्या धर्मगुरूनी याला मान्यता द्यावी.
अतिरेकी हा एक मुद्दा उपस्थित झाला होता. त्या वरून मला 100 व 5 या तत्त्वाची आठवण झाली. कौरव हे पांडवांचे शत्रू हे सर्व भारतात राहणाराना माहिती आहे. जेंव्हा कौरवावर गंधर्वानी आक्रमण केले तेंव्हा युधिष्ठिराने आपल्या भावाना कौरवांच्या मदतीला जाण्यास सांगितले. भीमाला हे पटले नाही. कौरव मरतात तर मरू द्यावेत असेच त्याला वाटले. परंतु युधिष्ठराला पूर्ण ज्ञान होते. आज त्यानी कौरवाना मारले तर उद्या ते आपल्याला मारण्यास कमी करणार नाहीत याची त्याला खात्री होती. म्हणूनच शंभर अधिक पांच हे बेरजेचे गणित त्याने केले. तशीच एक गोष्ट मला आठवते. कोणे एके काळी चार बैल एका जंगलात राहत होते. ते रात्रीच्या वेळी झोपताना सर्वांची शेपटे एकत्रित येतील व तोंडे चार दिशाना असतील या प्रकारे बसून झोपत असत. त्या मुळे त्याना शत्रू कोठूनही आला तर समजत असे. शत्रू आल्यावर सर्वच बैल एकत्रितपणे त्याचा सामना करत. त्या मुळे कोठल्याही बाहेरील शत्रूला बैलांच्यावर विजय मिळवता येत नसे. अतिरेकी कोठल्याही तथा कथित धर्माचा असला तरी त्याने राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन कोठल्याही राष्ट्रा बाहेरील व्यक्ती अथवा संस्थेला थारा देऊ नये. परंतु, काही लोक राष्ट्र हिता पेक्षा धर्महिताला प्राधान्य देतात व त्यातील बहुतेक लोक तथा कथित एका धर्माला मानणारे असतात ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही.
भारता मध्ये प्राचीन काळापासून ब्रह्मचर्याला महत्त्व दिले आहे. हे महत्त्व देण्याचे कारण म्हणजे संयम पाळणे ही सर्वात अवघड गोष्ट आहे. लैंगिक वासनेवर विजय मिळवला तर जगातील कोठल्याही वासनेवर विजय मिळवता येतो. जगामध्ये जे गुन्हे होतात त्यातील अधिकतम लैंगिक वासनेमुळेच होतात. म्हणूनच सर्व तथा कथित धर्मा मध्ये विवाहाबाहेर लैंगिक संबंध निषिद्ध समजले जातात. ब्रह्मचर्य म्हणजे पती -पत्नी व्यतिरिक्त लैंगिक संबंध त्याज्य असाच त्याचा अर्र्थ घेतला पाहिजे.
चतुष्पादाचे मांस खाण्यात गैर काहीच नाही. शेवटी जीव जीवावरच जगतो. परंतु त्या मध्ये जर डुकराला अभय दिले तर गायीला का नको? या प्रश्नाचे उत्तर शोधलेच पाहिजे. तसे पाहिले तर मांसाहारी लोक शाकाहारी लोकावर मांस खाऊन एक प्रकारे उपकारच करतात. सर्वच शाकाहारी झाले तर अन्न-धान्य सर्वाना पुरणारच नाही. दुसऱ्या बाजूला प्राण्याची संख्या इतकी वाढेल की त्याना पृथ्वी अपुरी पडेल.
पुन्हा एकदा धर्माविषयी. धर्माचे आधारस्तंभ चार. पहिला मूलतत्त्व, दुसरा नियम, तिसरा कायदे व चौथा उपासना. भारतामध्ये अशी धारणा आहे कीं, पृथ्वीवरील कालचक्रामध्ये प्रथम काल सत्ययुग, दुसरा त्रेतायुग, तिसरा द्वापारयुग, व शेवटी कलियुग. पृथ्वीवर या चक्राप्रमाणे धर्मावर प्रभाव पडतो. सत्ययुगात धर्म चार खांबावर स्थिर असतो, त्रेतायुगात एक खांब निखळतो. पुढे प्रत्येक युगात एक एक खांब निखळत जातो. शेवटी कलियुगात धर्म एकाच खांबावर आधारित असतो. याचे निरनिराळे अर्थ घेता येतील. त्या पैकी दोन अर्थ अशाप्रकारचे असू शकतील. धर्माचे खांब निखळणे म्हणजे धर्माचा ऱ्हास होणे. लोकामध्ये स्वार्थ भावनेचे महत्त्व वाढणे. दुसरा अर्थ धर्मावरील मनुष्याचे अवलंबित्त्व कमी होणे. मला हा दुसरा अर्थ जास्त संयुक्तिक वाटतो. थोडे विस्ताराने सांगतो. सत्ययुगात माणसाने ज्ञानी लोकावर विश्वास ठेऊन त्यांचे अनुकरण केले. मूलतत्त्वाचा अर्थ ज्ञानी लोकाकडून समजून त्याचे पालन केले. जसजसा समाज वाढत चालला तस तसे नवीन नवीन प्रसंग सामोरे आले. सर्वच प्रसंगात कसे वागावे याचा भ्रम निर्माण होऊ लागला. ज्ञानी लोकानी प्रसंगानुरुप सविस्तर नियम बनवले. त्रेतायुगात या नियमाप्रमाणे लोक वागू लागले. मूलतत्त्वाचे महत्त्व कमी झाले. कमी झाले म्हणजे लोकानी सोडून दिले नाही ते समजून घेणे कमी झाले. नियमाप्रमाणे वागणे हे लोकानी ध्यानात घेतले. समाज वाढत चालला. समाजामध्ये स्वार्थी लोकांची संख्या वाढू लागली. असे लोक नियम धाब्यावर बसवून आपला स्वार्थ साधू लागले. त्यावर उपाय म्हणून ज्ञानी लोकानी कायदे केले. समाजहिताविरुद्ध काम केले तर शिक्षा. द्वापारयुगात समाजस्वास्थ्याकरता शिक्षा करावी यावर जोर दिला जाऊ लागला. समाज वाढतच राहिला. प्रत्येक समुहाने आता पर्यंत आपआपल्या भौगोलिक सीमा आखल्या. प्रत्येक सीमेत राहणाऱ्या समाजाचे राष्ट्र झाले. प्रत्येक राष्ट्राने आपल्या घटना बनवल्या. घटनेमध्ये सर्व नियमांचा अंतर्भाव केला. कायदे बनवले. जेणे करून समाजात शांतता लाभावी या करता सर्व प्रयत्न केले. धर्माचे दोन आधारस्तंभ राजाकडे गेले. म्हणूनच कलियुगात धर्माचा एकच स्तंभ राहिला तो म्हणजे उपासना. सध्याच्या काळामध्ये धर्माची मर्यादा उपासनेपर्यंतच सीमित आहे. धर्माने आपली मर्यादा न ओलांडण्यावरच समाजाचे हित अवलंबून आहे. बंधुत्त्व हे ध्येय आहे. धर्म नव्हे. धर्माची संकल्पना बंधुत्त्वाकरता निर्माण झाली. बंधुत्त्वाची संकल्पना धर्माकरता नव्हे.
वरील विवेचना नंतर आपला मुख्य मुद्दा, 'आलमी-भाईचारा' म्हणजेच विश्वबंधुत्त्व. भाईचारा किंवा विश्व बंधुत्त्व हे अत्यंत गरजेचे आहे. आपआपसातील वाद मिटवून परकीय शत्रू पासून संरक्षणाकरता हे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु हे पायरी-पायरीने झाले पाहिजे. त्या करता भौगोलिक सीमा मानल्या पाहिजेत. धर्मांच्या परंपरा, चालीरिती, रूढी, उपासना वगैरे गोष्टीनी या मध्ये ढवळा-ढवळ करण्याची आवश्यकताच नाही. आपल्या शेपट्या एकत्र बांधून जर आपण सर्व एकशे पांच झालो तर आपोआपच बंधुत्त्व निर्माण होईल व टिकून राहील. या मध्ये भौगोलिक सीमा कुटुंबापासून सुरू होतात व विश्वा पर्यंत पोहचतात. कुटुंबावर हल्ला झाला तर कुटुंबातील सर्व व्यक्तीनी एकत्र येऊन युद्ध करणे, गांवावर हल्ला झाला तर संपूर्ण गांवाने प्रत्युत्तर देणे, पृथ्वीवर हल्ला झाला तर पृथ्वी वरील सर्व देशानी एकत्र येऊन परग्रहवासीयावर हल्ला करणे वगैरे. अशा प्रकारचे बंधुत्त्व निर्माण करण्यास कोठल्याही धर्म पंडिताची अगर ग्रंथाची मदत घेण्याची गरजच नाही.
धर्म हा फक्त उपासनेकरता मानावा. उपासना स्वतःच्या घरात, मंदिर, मशीद, चर्च, मॉनेस्ट्री किंवा शासन संमत जागेत प्रत्येकाने आपल्या मर्जी प्रमाणे करावी. महर्षि व्यासमुनीनी सांगितलेले तत्त्व धर्माचे मूलतत्त्व मानावे. तसेच राज्यघटनेतले कायदे पाळावेत. धर्माला विश्वबंधुत्त्वाच्या सापळ्यात पकडू नये.
बोला आपले काय म्हणणे आहे. मी ऐकून घेईन व माझे विचार आपल्याला कळवीन.
नमस्कार.

Religion: Universal Brotherhood

 

2 comments:

RAJ SINH said...

Zakir Naik sarkhya Dharmvedyach manan kela asata tar abhinandan karna shakyach jhala nasta .Dharmachya padya maghe Manvatecha vibhajan karnara ha manoos Abhinandneey ? Ha kasla ' brotherhood ' ?

माधव बामणे said...

समाजाला योग्य मार्गावरून नेण्याकरिता आपल्या पूर्वजानी काय केले?
पुरातन काळी देश ही संकल्पना नव्हती परंतु, सुरक्षित राहण्याकरिता ताकदीची आवश्यकता आहे हे सर्वच जाणत होते. ती ताकद एका गटात जास्तीत जास्त लोक आले तर मिळते हेही प्रत्येकाला पटले होते. परंतु, जेंव्हा दोन लोक एकत्र येतात तेंव्हा स्वार्थामुळे भांडणे होऊ शकतात व समूहात तेढ निर्माण झाल्यामुळे समूह फूटू शकतो. हेही समूहाला एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या लक्षात आले. त्यावर उपाय शोधताना त्यांच्या लक्षात आले असावे की समूहाकरिता नियम करणे हे आवश्यक आहे. त्या नियमांचे पालन झाले तर समूहात फूट पडण्याची शक्यता कमीत कमी होईल. परंतु, नियम केले तरी ते पाळले गेले तरच त्यांचा उपयोग. अन्यथा ते सर्व निरुपयोगी. उदाहरणार्थ स्वयंचलित दुचाकी चालवणारानी तसेच त्यावरून प्रवास करणारानी हेल्मेट घालणे सुरक्षितेच्या दृष्टीने योग्य असल्याने तसा नियम आहे. परंतु, तो किती लोक पाळतात? याचाच अर्थ फक्त नियम करून उपयोगी नाही. तो पाळला जाण्याकरिता योग्य व्यवस्थाही असणे गरजेचे आहे. सध्या त्याकरिता पोलिस तसेच न्यायालये आहेत. तरीपण हा नियम पाळला जात नाही. आपल्या पूर्वजानाही हा प्रश्न नक्कीच पडला असेल. परंतु, ते हातपाय गाळून जनता नियम पाळत नाही असे रडगाणे गात बसले नाहित. त्यांनी त्या करिता सुंदर, विश्वसनीय तरीही कोठलाही खर्च करण्याची आवश्यकता नसणारी व्यवस्था निर्मण केली. ती व्यवस्था म्हणजे धर्म आणि देव. समाजातील सर्व घटकानी आपापसात कसे वागावे त्याकरिता तत्वे सांगितली व त्या अनुषंगाने नियम बनविले. तत्वे ही शास्वत परंतु, नियम स्थळ, काळ तसेच समाजाप्रमाणे बदलणारे म्हणजेच आपल्या राज्यघटनेसारखे. हे नियम समाजातील प्रत्येक घटकाने पाळावेत म्हणून पोलिस व न्यायाधीशाची पण नियुक्ती केली. परंतु, हा पोलिस तसेच न्यायाधिश प्रत्येकाच्या मनात बसविला. तो मनात असल्याने समाजघटक केंव्हाही काहीही करत असेल तेंव्हा तो पाहणारच व पोलिसांने खटला भरण्याची पुरावे तपासणीची वाट न पाहता निर्णय देणार. या निर्णयावर कसलाही आक्षेप घेण्याला वाव मिळू नये म्हणून हा पोलिस/न्यायाधिश सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, निर्गुण, निराकार बनविला व त्याला देव अशी ओळख दिली. सध्यासुद्धा शासनाने नियम (कायदा) बनविताना अशा क्लुप्त्या शोधल्यापाहिजेत की तो कायदा जनतेने पाळलाच पाहिजे. शासन जर हे करू शकले तरच त्यामध्ये शासन करण्याची क्षमता आहे असे समजावे. हेल्मेटच्या उदाहरणात काय करता येईल ते पाहू. समजा जर असा कायदा असेल की हेल्मेट घातले नसेल तर वाहनचालकाचा परवाना रद्द समजण्यात यावा. तसेच अपघातात विम्याची रक्कम शून्य समजावी. अशाप्रकारे काही केले तर तो कायदा पाळला जाण्याची शक्यता जवळ जवळ १००% असेल.

Popular Posts