Tweet

Tuesday, 15 March 2011

मेट्रोला धोपटणे आता थांबवाः

राजकारणी लोकांची मानसिकता वेगळी असते. लोकांच्या गळी आपले म्हणणे उतरविण्याकरिता ते कांहीही करू शकतात. दाभोळ वीज प्रकल्पाचे उदाहरण फार जुने नाही. अरबी समुद्रात प्रकल्प बुडविण्याची भाषा करत तो वाढीव क्षमतेसह त्यांच राजकारण्यांनी मंजूर केला. पीएमपीएलकडे पुरेसा निधी असतानाही काही ना काही मुद्दे उपस्थित करून बस खरेदी लांबवली.
नागरिकांच्या सोईचे त्यांच्या ध्यानीमनी कधीही नसते. मेट्रोचेही असेच होणार. सध्या मेट्रोला विरोध करणारे शासनात आल्यावर ते त्याला नक्की मंजुरी देतील. परंतु, मेट्रोची खरोखरच आवश्यकता आहे काय? हा मुद्दा कोणीही तपासून पहात नाही. त्याचे कारण म्हणजे आपण आपल्याभोवती आखून घेतलेल्या रेखा. त्याबाहेर काही असू शकते हेच आपण मान्य करत नाही. इमारती बांधण्याकरिता जागा कमी पडते. त्यावर एकच उपाय सुचतो. परिघावरीव खेडी शहरात सामील करून घ्या. त्यावेळी आपणाला कोठलाही दुसरा प्रश्न सुचत नाही. जर खेडी समाविष्ठ केली तर वाहतुकीचे काय होणार तसेच इतर सोईसुविधांचे काय होईल किंवा इमारती बांधकामासाठी बाहेरून किती लोक येतील व ते परत जातील काय, बाहेरून आलेल्या लोकांची कशी सोय करायची, किंवा शहरातील लोकसंख्या वाढल्यास त्याला कसे तोंड द्यावयाचे. हे प्रश्न फक्त उदाहराणादाखल दिले आहेत. असे बरेच प्रश्न पडलेच पाहिजेत. आपण स्वतःसाठी आखून घेतलेल्या रेषामुळे हे प्रश्न पटले तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते व पुन्हा पुन्हा आपण खोड्यात सापडतो. हे होणे नकोअसेल तर प्रथम आपण आपणास विचारू या कि, शहराची वाढ करणे आवश्यक आहे काय व आवश्यक असेल तर परिघ विस्तारण्याशिवाय दुसरा उपाय नाही काय? जुन्या काळी मानववस्ती नदीकाठाने होत असे. वर्तमानात ती रस्त्याकाठाने होते. हे सत्य जाणून घेतले तर जशी आधी नदी नंतर मानववस्ती त्याचप्रमाणे आधी रस्ता मग शहर हे पटवून घेणे अवघड नाही. जर सध्याच्या शहरात नवीन रस्ते बांधणे अवघड असेल तर इतर शहरांना जोडणारे रस्ते बांधणे शक्य आहे. असे रस्ते नापीक जमीनीवर बांधावेत. तसेच रस्ताच नाही तर इतर सुविधांकरिता तेथे भरपूर जागा उपलब्ध असावी. म्हणजेच एक 150 मिटर रुंद कॉरिडॉर बनवावा व त्याचे बाजुला नियोजनपूर्वक शहरे वसवावीत.
तज्ज्ञांच्या मते मेट्रोचे भाडे नागरिकांना परवडण्यासारखे नाही, जगामध्यें इतरत्र सर्वसाधारणपणे मेट्रोची 20 टक्केच क्षमता वापरली जाते व ती जगात कोठेही यशस्वी झाली नाही. मेट्रोच्या झगमटाला भुलून जाऊ नये. तो प्रश्न प्रतिष्ठेचा करू नये. मेट्रो हवी का नको या पेक्षा शहरवाढ कशी करावी हा निर्णय महत्वाचा आहे.
सध्याच्या शहराकरिता विनाअडथळा बसरस्ता व लोकल ट्रेन हे पर्याय प्रथम तपासले पाहिजेत. बीआरटी अयशस्वी होण्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये ठळक कारण असुरक्षितता. सर्वच बसमार्ग सुरक्षित केले तर इतर तृटीवर उपाय करणे हा हाताचा मळ आहे. सुरक्षित करण्याकरिता त्रिसुत्रीचा उपयोग केला पाहिजे. बसमार्गावर इतर वाहने येऊ न देणे, प्रवाशाना बसथांब्यापर्यंत सुरक्षित पॅसेज बनविणे व चौकातून जाणारा बसमार्ग सुरक्षित करणे. बसमार्गावर प्रवेश व बाहेर पडण्याकरिता फक्त बसस्थानकांतूनच सोय असावी. जर कोणी खाजगी वाहन घुसविण्याचा प्रयत्न केला तर त्याला दंड करावा. तसेच जर बसमार्गावर बसने खाजगी वाहनास धडक दिली तर कसलीही साह्यता करू नये. बसमार्गाची रुंदी दुहेरीकरिता 8 मिटर व एकेरीकरिता 5 मिटर असावी. मार्गाच्या दोन्ही बाजूला सुरक्षित कुंपण असावे, दुहेरी मार्गावरील दुभाजक रंगित पट्टयांचा असावा. जेथे जेथे चौक अथवा रोडक्रॉसिंग असेल तेथे तेथे बसमार्ग उड्डाणपुलावरून जावा. बसथांबा शक्यतो उड्डाणपूल जेथे संपतो त्यापासून 20 ते 30 मिटर दूर असावा. बसथांब्यावर प्रवाशाना जाण्याकरिता बाजूच्या मार्गावर उड्डाणपूल असावेत जेणेकरून पदपथावरून थेट थांब्यावर जाता येईल. थांब्याच्यापुढे मात्र प्रवाशाना जाता येऊ नये म्हणून अडथळे असावेत. याकरिता खर्च येईल पण तो दुर्लक्षित करण्यासारखा कमी असेल. येवढे जरी केले तरी बसमार्गावरच्या 90 टक्के किंवा जास्त अडचणींचे निराकारण होईल.

No comments:

Popular Posts