Tweet

Saturday 23 April 2011

सैन्यदलामध्ये अधिकाऱ्यांची कमतरताः

"सैन्यदलामध्ये सेवावेतन कमी असल्यामुळे तरुण सैन्यदलात जात नाहीत" असा सर्वांचा सूर आहे. परंतु, हे पूर्ण सत्य नाही. गेल्या काही वर्षात या बाबत काही प्रयोग केले गेले तरी ही त्रुटी दूर झाली नाही. सैन्य अधिकाऱ्यांच्या वेतनात बऱ्यापैकी वाढ केली गेली. बढतीकरता लागणारा कालावधी कमी केला. उच्च पदे वाढवली गेली वगैरे. इतके करुनही
कमतरता अंशतःही कमी झाली नाही. याचा अर्थ सेवावेतनात वाढ करणे हा एकमेव उपाय नाही. सर्वसामान्य जनतेमध्ये भ्रम आहे. सैन्यात गेला म्हणजे मरणारच. हिरोशिमा व नागासकी मधील नागरिक सैन्यात होते? अतिरेक्यांच्या बाँबस्फोटात फक्त सैनिक मरतात? रस्त्यावरील अपघातात कोण मरते? हा भ्रम दूर केला पाहिजे. दुसरे कारण जेंव्हा कौटुंबिक जबाबदाऱ्या परमसीमेला पोहतात तेव्हा निवृत्तीचे वय येते. त्या करता या अधिकाऱ्याना वयाच्या 60 वर्षापर्यंत नोकरीची शाश्वती असली पाहिजे. अर्धसैनिकदले, पोलिस वगैरे सेवा मध्ये 58 वर्षापेक्षा कमी वयात निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्याना सामाऊन घेण्याची तरतुद केली पाहिजे. अशीच तरतुद इतर सैनिकाकरता सुद्धा असावी.
तरुणाना सैन्यदलाकडे आकृष्ट करता येईलः

उद्येश सफल होण्याकरता मुळापासुन कारणे शोधणे व त्यावर विचारपूर्वक नियोजन करणे हाच शास्वत उपाय आहे. प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित, प्रतिष्ठित, समृद्ध जीवन जगण्याची आकांक्षा असते. त्यामध्ये काहीना साहसाची आवड असते. पैसे दिले तर सर्वच व्यक्ती मोटोक्रॉस स्पर्धेत भाग घेणार नाहीत. ज्याना साहसाची आवड आहे तेच अशा स्पर्धात दिसतात. म्हणजेच पैसा हा सर्वच स्थितीत उपयोगी पडणारा उपाय होऊ शकत नाही. तरुणाना सैन्यदलाकडे आकृष्ट करण्याकरता त्रिसुत्री कार्यक्रमाची आवश्यकता आहे. एक, सुरक्षा. नोकरी करताना व निवृत्ती नंतर आवश्यक गरजा भागवण्या इतपत आर्थिक प्राप्ती. दोन प्रतिष्ठा. समाजामध्ये वावरताना सर्व ठिकाणी मिळणारी प्राथमिकता. अशी प्राथमिकता नोकरी करताना व निवृत्ती नंतरही मिळाली पाहिजे. तीन समृद्ध जीवन. प्रत्येकाला छंद असतात. प्रत्येकाला जगावेगळे करण्याची आकांक्षा असते. परंतु पैसा कमावण्याच्या चिंतेत ते करण्याकरता वेळच होत नाही. ज्यावेळी वेळ मिळतो तेंव्हा वेळ टळलेती असते. या प्रत्येक बाबीवर स्वतंत्रपणे लिहावे लागेल.
सैनिकांचे जीवन सुरक्षित कराः

सैन्यातील जवान व अधिकाऱ्याना कसलीही चिंता असु नये. प्रत्येकाला सर्वात जास्त चिंता स्वतःच्या कुटुंबाची असते. सैन्यदले त्याला अपवाद नाहित. राहण्याकरता मोफत घर मग जवान असु द्या अगर अधिकारी. कामाच्या ठिकाणी घर देणे शक्य नसेल तर दुसऱ्या सोयीच्या ठिकाणी द्यावे. निवृत्तीनंतरही मोफत घर द्यावे. हल्ली मोफत रेशन मिळते परंतु ते फक्त जवान व अधिकाऱ्याला. त्यंच्या कुटुंबालाही ही सवलत मिळाली पाहिजे. मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च शासनाने उचलावा. त्या करता केंद्रिय विद्यालयाप्रमाणे महाविद्यालये व विद्यापीठे स्थापन करावित. जे 5 ते 15 वर्षांच्या नोकरी नंतर सेवानिवृत्त होतील त्याना केंद्र व राज्य शासनाच्या इतर सेवामध्ये सामाऊन घ्यावे. शक्यतो वरिष्ठपदाकरता जी संख्या लागते तेवढे जवान व अधिकारी ठेऊन बाकी सर्वाना वेगवेगळ्या पदावरुन निवृत्त करावे. वेळेवर पदोन्नती न झाल्याने निराश होणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. सैन्यदलात निराशाग्रस्त जवान वा अधिकारी नसावेत. फक्त वेतन वाढवुन शासनाने स्वतःची जबाबदारी झटकुन टाकु नये. जर सवलती दिल्या तर वेतन इतराप्रमाणे देण्यास कोणी हरकत घेणार नाही.

सैनिकांचे जीवन समृद्ध व प्रतिष्ठित बनवाः

सैन्यातील जवान व अधिकाऱ्याना वर्षातुन दोन महिने सुट्टी मिळते. परंतु ती सुट्टी अल्हादायक बनवण्याकरता त्यांचेकडे साधन-सवलती नसतात. भारतामध्ये कोठेही जाण्याकरता रेल्वेची तिकीटे, दोन महिन्यांच्या रेशन बद्दल मोबदला, एक महिन्याचा पगाराएवढा बोनस द्यावा. त्यांचेकरता रेल्वने कोटा ठेवावा. हा कोटा रेल्वेने प्रवासाच्या 3 दिवस अगोदर इतराकरता, जर शिल्लक राहिला तर, खुला करावा. जम्मु, न्यू जलपायगुडी, गोहत्ती अशा स्थानकावरुन सैनिकाकरता स्वतंत्र रेल्वे देशाच्या दुसऱ्या टोकापर्यंत रोज सोडावी. प्रेक्षणिय तथा धार्मिक स्थळाजवळील रेल्वेस्थानकावर सैनिक आरामगृहे मोफत उपलब्ध असावित. जवान सुट्टीवरुन ताजातवाना होऊन परत यावा. ही सवलत सैनिकाच्या पूर्ण कुटुंबाकरता असावी. जवानाना त्यंाच्या मातृभाषेत इतिहास, भुगोल, विज्ञान या विषयाच्या कादंबऱ्या तसेच पुस्तके स्वस्तात उपलब्ध असावित. सुट्टी फक्त वर्षातुन एकदाच मिळत असल्याने त्यांची शासन दरबारी प्रलंबित असलेली कामे त्वरित निकाली काढावित. सर्व ठिकाणी जवानाकरता स्वतंत्र रांग असावी. अशी प्राथमिकता फक्त सेवेत असतानाच नाही तर सेवानिवृत्त झाल्यावर सुद्धा द्यावी. अशा जीवनाची हमी दिली तर वेतन इतराप्रमाणे देण्यास जवान हरकत घेणार नाहीत.

शालेय विद्यार्थ्यात सैनिक शोधाः

इंग्रजीत म्हणतात 'Catch them young' म्हणजेच लहान मुलावर संस्कार करणे सोपे असते. NCC चा उपक्रम शाळा महाविद्यालयात राबवला जातो. परंतु तो मनावर घेऊन अभावानेच राबवला जातो. हा उपक्रम सैन्यदलाकडे द्यावा. सैन्यदलानी प्रत्येक तालुक्याच्या गावी प्रमुख शाळेमध्ये (किंवा महाविद्यालयामध्ये) त्या तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयातील इच्छुक मुलामुली करता हा उपक्रम राबवावा. सर्व शाळा व महाविद्यालयानी NCC प्रशिक्षण घेवु इच्छिणारी मुले मुली आठवड्यातुन एक दिवस तेेथे पाठवावित. शाळा व महाविद्यालयानी सुट्टीचे दिवस गरजेनुसार बदलावेत. NCC प्रशिक्षण घेतलेल्या मुलामुलीना शासन मान्य सर्व स्पर्धा परिक्षेमध्ये 1 ते 5 टक्के विशेष गुण द्यावेत. त्या करता या प्रशिक्षणाच्या 5 परीक्षा प्राथमिक शाळा ते पदवी अभ्यासक्रम या कालावधीत असाव्यात. पुर्वीच्या काळी सैन्यदलामध्ये 'Boys' Battalions' असत. त्यांचा उद्देश सैन्यदलाना योग्य व इच्छुक उमेदवार मिळवणे हाच होता. लहान वयातील उमेदवाराना गोडी लावणे, शिकवणे सोपे असते. सैन्य दलातील अधिकाऱ्यांची चणचण दूर करण्याकरता लहान वयात मुलामुली मध्ये गोडी लावणे, नोकरी मध्ये सुरक्षा, जीवनात समृद्धी तसेच प्रतिष्ठा, याच बरोबर निवृत्ती नंतरही सुरक्षित, समृद्ध व प्रतिष्ठित जीवनाची हमी हाच एक शास्वत उपाय आहे.

No comments:

Popular Posts