Tweet

Saturday, 23 April 2011

गणेशोत्सवाचे स्वरुप कसे असावे?धर्माचा उद्देश समाजामध्ये ऐक्य निर्माण करणे हा आहे. तसेच त्याचे मूलतत्त्व बंधुत्त्व हे आहे. परंतु, काही स्वार्थी लोकांनी लोकांचे लक्ष पूजा-अर्चेकडे वळवून स्वतःकरिता अर्थार्जनाचा सोपा मार्ग शोधून काढला. त्यामुळे सर्वांची समजूत झाली की धर्म म्हणजे पूजा-अर्चा. पूजेचे नियम पाळले की मनुष्य धार्मिक समजला जातो.
तोच धर्म समजला जातो. त्यामुळे धर्मांधर्मांत तेढ निर्माण होते. तसे पाहिले तर विश्वात फक्त एकच धर्म आहे व तो म्हणजे 'बंधुत्त्व'. निरनिराळी नांवे दिसतात. त्याचे कारण म्हणजे स्थल-काल-समाज यामध्ये असणारी तफावत. निरनिराळी नांवे या भेदामुळे आली. निरनिराळ्या काळी, निरनिराळ्या स्थळी तसेच निरनिराळ्या व्यक्तीसमूहाकरिता (समाजाकरिता) निरनिराळे नियम अपरिहार्य आहेत. हीच गोष्ट गणेशोत्सवाची पण आहे. लोकमान्यांचा उद्देश समाजामध्ये स्वराज्याविषयी लोकजागृती करणे व त्यांनी पाहिलेले मूलतत्त्व एकसंघ समाज, एकसंघ राष्ट्र निर्माण करणे हेच होते. ते आजही सत्य आहे व निरंतर सत्य राहील. हे समजून घेतले तर गणेशोत्सव कसा साजरा करावा हे आपसुकच समजेल.
व्यक्ती प्रशिक्षण व समाजजागृती करिता लोकमान्यांनी पुराण कथांचा आश्रय घेतला. पारतंत्र्यात असल्यामुळे लोकांना सरळ संदेश देणे अवघडच काय अशक्य होते. आता स्वातंत्र्य मिळाले आहे. संदेश देण्याकरिता आडवळणाचा मार्ग शोधण्याची आवश्यकता नाही. विज्ञानाने प्रगति केली आहे. राष्ट्राला समृद्ध करण्याची, ताकदवान बनविण्याची, लोकांचे जीवन सुखी करण्याचे, समृद्ध करण्याचे वगैरे आव्हाने सध्याच्या काळात आहेत. विज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या साधन सामुग्रीचा पूर्ण उपयोग करून लोकमान्यांना अभिप्रेत असलेला उद्देश मूलतत्त्वाला धक्का न लावता साध्य करणे हे शक्य आहे. गणेशोत्सव ही प्रमाणे मानून साजरा करावा. देखावे दगडमातीचे बनवण्याऐवजी त्रिमिती तंत्र वापरुन बनवावेत. ध्वनिक्षेपकांच्या भिंती बांधण्याऐवजी बिनतारी तंत्र वापरून सौम्य आवाज सर्वत्र पोहचवावा. देखाव्यांचे विषय जनतेचे निरनिराळे प्रश्न व त्यावरील उत्तरे हे असावेत. मंदीराचा देखावा बनविण्याऐवजी हिरवेबाजारचा देखावा उभारावा. राष्ट्राच्या समृद्धीत वाटा असणारे कित्येक प्रकल्प भारतात आहेत. ते दाखवावेत. रहदारीसारख्या विषयांवर प्रबोधनही शक्य आहे. विचार केला तर कित्येक विषय मिळतील.

गणेशोत्सवच का?

भारतभर गणेशाला आद्य पूजेचा मान आहे. गणेश ही एकच देवता आहे की जिचे पूजन सर्व जातीचे लोक करतात, सर्वांची निष्ठा गणेशाप्रति होती, आहे व असेल. लोकमान्यांनी जेंव्हा हा उत्सव सुरू केला तेंव्हा त्यांच्या मनात हाच विचार असावा. 25 सेप्टेंबर 2010 च्या साप्ताहिक सकाळमध्ये डॉ. सदानंद मोरे यानी आपल्या 'गर्जा महाराष्ट्र माझा' या सदरात गणेशोत्सवावर इंग्रजधार्जिण्या इंग्रजी वर्तमानपत्रात आलेल्या टीकेचा उल्लेख केला आहे. 'फोडा व झोडा' या धोरणाप्रमाणे इंग्रजांनी गणोशोत्सवाला ब्राह्मण हा रंग लावला. लोकमान्यांनी सुरु केलेल्या शिव छत्रपतिंच्या उत्सवास मराठा हा रंग दिला. या रंगावरून ब्राह्मण-मराठा असा भेद दाखवून त्यांचेमध्ये भांडण लावून दिले. लोकमान्यांना छत्रपति शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरते सीमित ठेवावयाचे नव्हते. त्यांना निदान राष्ट्राच्या चौकटीत बसवावयाचे होते. डॉक्टरांनी असेही उद्धृत केले आहे की लोकमान्यांच्या मते शिवाजी महाराजासारखी राष्ट्रविभूती इतर कोठल्याही प्रांतात जन्मली, मुसलान धर्मातही जन्मली तरी त्या विभूतीकडून सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे.
तात्पर्य माझ्यामते हेच की, गणेशोत्सवाचा प्रधान हेतु उत्सवाच्या निमित्ताने सर्वाना एकत्र आणून जनजागृतीकरिता या उत्सवाचा फायदा घेणे. जो पर्यंत सर्वमान्य दुसरा कोठला उत्सव सुरू होत नाही तो पर्यंत हा उत्सव टिकवला पाहिजे व त्याचा उपयोग जनजागृतीकरिता केला पाहिजे.

गणेशोत्सवाचे बदलते रुप.

लोकमान्यांच्या काळापासून आतापर्यंत खूप बदल होत राहिलेत. मध्यंतरी 'मोठा आवाज' म्हमजे मोठा उत्सव हे सूत्र राहिले. पौराणिक देखाव्यांवर भर राहिला. परंतु हळु हळु सध्याच्या परिस्थितीनुसार बदल होत आहेत. आवाजाऐवजी रोषणाई, स्लाईड शो, पर्यावरण जागृती, विकास वगैरेना प्राधान्य मिळू लागले आहे. गुलालाचा उपयोग नगण्य होत चालला आहे, रात्री 10 नंतर आवाज बंद होतो, लेजीम, ढोल, ताशे, वारकऱ्यांची रिंगणे वगैरेंना मान्यता मिळू लागली आहे. पुजाऱ्यांना महत्त्वाची वाटणारी पूजा साग्रसंगित होत आहे. सगळेच असे करू लागले असे नाही. परंतु या मार्गाने काही मंडळे जाऊ लागली आहे. सर्वच गोष्टी बदलेल्या नाहीत. अजूनही खूप बदल केले पाहिजेत. असे बदल होण्याची आशा निर्माण झाली आहे.

No comments:

Popular Posts