Tweet

Tuesday, 26 April 2011

महंमद पैगंबरांची जीवनगाथा व हिंदुत्त्व - इस्लामित्त्व


डॉ. इब्राहिम फैज़ हे विचारवंत व स्वतःच्या विषयांत पारंगत असावेत. परंतु, त्यानी आपल्या लेखात दोन सारख्या रेषेतील स्वतःची रेखा लांब दाखवण्याकरिता दुसऱ्याची रेखा पुसण्याचा प्रयत्न केला आहे. तसे पाहिले तर जगातील सर्व धर्मांचे मूळतत्व एकच. बंधुभाव. सर्वच धर्म एकच ईश्वर आहे असे मानतात. हिंदूधर्मही सांगतो 'सर्व देव नमस्कारः। केशवम् प्रतिगच्छति।'
असे असताना कोठलाही धर्म इतर कोठल्याही धर्मापेक्षा उच्च अथवा कनिष्ठ असूच शकत नाही. डॉक्टरसाहेब तुलना धर्मनियमांची करत आहेत. परिस्थिती वर्णन भारताशी निगडित आहे. पैगंबरसाहेब ना भारतात जन्मले ना त्यांनी  इस्लामची स्थापना भारतात केली. त्यामुळे भारतातील परिस्थिती सांगणे हे अप्रस्तुत आहे. त्यामुळे विनाकारण वाद निर्माण होईल. धर्मनियम हे परिस्थितीनुसार विशिष्ठ काळी विशिष्ठ मानवसमूह डोळ्यापुढे ठेवून निस्वार्थी, विद्वान तसेच त्या मानवसमूहाचा उत्कर्ष व्हावा असा विचार करणारे बनवितात. पैगंबरसाहेबानीही तेच केले. परंतु, इस्लाममध्ये स्थळ, काळ व समाज यामधील एक जरी गोष्ट बदलली तर नियमामध्ये बदल केला पाहिजे हे मान्य केले नाही. भारतामध्ये असे बदल होतात व होत राहतील. डॉक्टरसाहेबानी अरबस्तानातील परिस्थति बाबत भाष्य करावे, इस्लामधर्म मानणारे अतिरेकी का होतात यावर संशोधन करावे. इतर धर्मावर भाष्य करण्यापासून अलिप्त रहावे.


सर्वसाधारणपणे भारतात दोन गट दिसून येतात. एक गट मानतो कि इस्लाम हा खरा धर्म आहे. तो बंधुत्त्व मानतो, धर्माला देशाच्या सीमा मानत नाही. त्यामुळे सर्व जगाकरिता हा एकमेव धर्म होऊ शकतो. दुसरा गट भूमिका घेतो की, भारतामध्ये हिंदू हा धर्म हजारो वर्षांपासून प्रचलित आहे, तो सर्वसमावेशक आहे. त्यांमध्ये कित्येक धर्म विलीन झाले. त्यामध्ये बदल स्वीकारण्याची शक्ति आहे. त्यामुळे भारतियत्त्व व हिदुत्त्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही विचारसरणीत काही साम्यस्थळेही आहेत.
दोन्ही गट आपापल्या विचारसरणीशी (ती वेगळी वेगळी असली तरी) ठाम आहेत. त्यांची विसारसरणी बालपणापासून बनवली जाते. त्याकरिता विशिष्ठ शिक्षण दिले जाते. हे शिक्षण कट्टरपंथीयच आहे. त्यांच्यात बदल करणे अशक्य नसले तरी कष्टसाध्य आहे. आपला धर्म सर्वसमावेशक आहे असे प्रतिपादन करतात परंतु, प्रत्यक्षात पूर्वजांच्या कृत्यांचे समर्थन करीत एकमेकाशी भांडतात. महर्षी व्यासांची धर्माची व्याख्या सर्व सजीवांकरिता नसून फक्त समुदायाशी संबंधित आहे असे मानतात. आपल्या कोठल्याही कृत्याची भलावण करताना दुसऱ्याकडे बोट दाखवतात. त्यांनी अमूक केले म्हणून आम्ही तमूक केले यापलिकडे त्यांचेकडे कोठलेही कारण नसते. धर्मनिरपेक्षतेचा विचारही त्यांना अक्षम्य वाटतो. धर्म देवाने स्थापला असे त्यांना वाटते. देवाने धर्म स्थापला तर तो वेगवेगळ्या लोकांकरिता वेगवेगळा का? यावर त्यांचेकडे उत्तर नसते.

या दोन्ही गटांत वेगळेपण दिसते. अनामिकांना वेगळे नांव आहे. उदाहरणार्थ ईश्वर-परवरदिगार, हिंदू-इस्लाम, वेद/गीता-कुराण. हिंदू राष्ट्राची सीमा मानतात तर मुसलमानांना प्रादेशिक सीमा मान्य नाही. मुसलमान मग तो पाकिस्तानी असला तरी त्याच्या कृत्याचे समर्थन करतात. एखाद्या मुसलमानाचा अवमान म्हणजे इस्लामचा अवमान म्हणजेच जगातील सर्व मुसलमानांचा अवमान ही कट्टर विचारसरणी अवलंबितात, त्यालाच ते बंधुत्त्व असे गोंडस नांव देतात. मुसमानांचे इमान फक्त इस्लामशी असते. त्यांना जन्मभूमि दुय्यम वाटते. पाकिस्तानी मुसलमानांनी भारतात काहीही केले तरी त्याचे प्रत्यक्ष समर्थन नाही केले तरी निदान मूकसंमती तरी देतात. कट्टरवादी मुसलमान मग तो कोठल्याही देशातील असो, त्याने कोठलेही दुष्कृत्य केले तरी त्याबद्दल साधा निषेधसुद्धा नोंदवत नाहित. जमल्यास मदत मात्र करतात. हिंदू मेलेले मुडदे उकरुन काढून मुसलमान कसा देशाचा शत्रू आहे व सर्व मुसलमानांना पाकिस्तानात हाकलुन द्या अशी मागणी करतात.  मुसमानाशी व्यवहार नको इतकेच काय त्यांच्याशी कसलीही तडजोड करण्यास विरोध करतात. ते हे विसरतात की, समजा सर्व मुसमानांना भारताबाहेर हाकलुन दिले म्हणून भारतापुढील समस्या संपणार नाहीत.

ईश्वराची इच्छा दोन्ही गटानी एकत्र राहावे व स्वतःबरोबर जास्तीत जास्त लोकांची उन्नती करावी असे कोणताही गट मानत नाही. श्री छत्रपति शिवाजी महाराजांनी हे अचूकपणे ओळखले. त्यांनी मुसमान धर्मिय म्हणून कोणालाही शिक्षा केली नाही. शिक्षा करताना गुन्हेगार कोठल्या धर्माचा आहे याचा विचार केला नाही. त्यामुळेच त्यांना परदेशीय राज्यर्कत्याविरुद्ध लढायांमध्ये यश आले. महाराजांची विसारसरणी धर्मनिरपेक्ष असल्याने कसलेही पाठबळ नसताना त्यांना स्वराज्य स्थापता आले. सध्या पिढ्यानपिढ्या वैर बाळगण्यांत दोन्ही धार्मिक गटांना स्वारस्य आहे. यामागचे खरे कर्ते मात्र या दोन्ही गटातील आपापले पुजारी आहेत. भारतातील हिंदू-मुसमान दंग्यांचा इतिहास पाहिला तर सर्वसामान्य जनता एकमेकांना मदत करताना धर्मभेद करत नाहीत. अशा दंग्यात हिंदुंनी मुसलमानांना वाचवल्याची व या उलट मुसलमानांनी हिंदुंना मदत केल्याची कित्येक उदाहरणे आहेत. तसेच हे दंगे भडकावण्याचे काम त्या त्या धर्मातील पुढाऱ्यांचेच हे सिद्ध झाले आहे. हे समजुन घेऊन त्याप्रमाणे मार्ग काढल्यास हे दोन्ही गट एकमेकाशी घट्टपणे बांधले जातील. यामध्ये कोण पुढाकार घेतो याची शर्यत लागली पाहिजे. कोणीही दुसऱ्याची वाट पाहू नये. हे झाले नाही तर भारताचे तुकडे करण्याची चिन्यांची योजना फलद्रुप होईल.

आपल्याoअनुभवावरून
आपल्या अनुभवावरून आपण विश्वाचे ज्ञान प्राप्त करतो. आजुबाजुला जे पाहतो तसेच सर्व ठिकाणी असते यावर आपला पूर्ण विश्वास असतो. कोठलीही सिस्टीम नियंत्रित करण्याकरिता कोणी तरी असले पाहिजे अशी आपली खात्री असते. यामुळे विश्व नियंत्रित करणारा कोणी तरी असणार, सर्वशक्तिमान असणार, ज्ञानी असणार वगैरे आपण मानतो. जोपर्यंत  विश्वात घडणाऱ्या गोष्टी कशा घडतात याबद्दल ज्ञान प्राप्त होत नाही तो पर्यंत तरी देवाचे अस्तित्व मान्य करणे या शिवाय पर्याय नाही.

हा देव कसा असावा या बद्दल प्रत्येकाच्या कल्पना असतात. त्यामध्ये वेगवेगळेपण अनिवार्य आहे. विज्ञान सांगते की, शक्ति शिवाय विश्वात कोठलाही बदल होऊ शकत नाही. शक्ति निर्माण करता येत नाही परंतु तिचे रुप बदलता येणे शक्य आहे. या रुप बदलण्यात मात्र शक्तिची पातळी खालावते. हा विचार समोर ठेऊन विचार केला तर देवाचा शक्तिशी संबंध आहे असे म्हणावे लागेल. भारतीय संस्कृतीत शक्तिला अनन्य महत्त्व आहे.  आपण शक्तिपूजा करतो. शक्ति हा शब्द स्त्रीलिंगी आहे. यावरून असेही म्हणता येईल की, भारतात पूर्वी स्त्रीप्रधान संस्कृती असावी. पशुप्राण्यांमध्यें नर व मादी असते तेंव्हा आपल्या देवातही नर-मादी असावेत काय, असलेच पाहिजेत यावर आपण सहज विश्वास ठेवतो. आपण पाहतो की, जगात सर्वंच बाबतीत नर हा शारिरीक बळात जास्त शक्तिमान असतो. म्हणजेच देव हा शक्तिपेक्षा बलवान असलाच पाहिजे. पुरुषप्रधान संस्कृतीत देवाला प्राधान्य मिळते व देवी त्याची अर्धांगनी असते. अशा प्रकारे आपण देवावर निष्ठा ठेवतो.

आपण भांडत बसतो. परंतु, ज्ञानी लोकानी या निष्ठेचा सुंदर, अप्रतिम उपयोग करून घेतला. देवामध्ये सर्व गुण आहेत त्या बद्दल सर्व जनांची खात्री करून दिली. कोणी दुसऱ्या सजिवाला फसवू शकतो परंतु देवाला नाही. देव सदा सर्वकाळ सर्वावर नजर ठेऊन आहे. तो प्रत्येकाच्या मनातील विचारही जाणतो. अशा प्रकारे सर्वांच्या मनांत त्यांनी देवाबद्दल आदरपूर्वक भीती निर्माण केली व त्यातून धर्म नांवाची समाजनियंत्रणाकरिता त्या सम ती अशी नियंत्रण प्रणाली बनवली व कित्येक वर्षे राबवली. या प्रणालीचा खर्च शून्यात जमा, यशाची खात्री जवळ जवळ 100 टक्के, सर्व दृष्टीने सुरक्षित. धर्माला महत्त्व असण्याचे हे मुख्य कारण असावे. देव-देवी-देवता या जरी संकल्पना असल्या तरी त्याबद्दल निश्चित माहिती आपणपैकी कोणाला नाही. तरी पण ही संकल्पना समाजस्वास्थाकरिता आवश्यक आहे. त्यामुळे माझे मत असे आहे की धर्म टिकवण्याकरिता देवाचे अस्तित्व मान्य केले पाहिजेत. त्यामध्ये निर्माण केलेले अडथळे, लालूच वगैरेंचे निराकारण करावे.

No comments:

Popular Posts