Tweet

Saturday, 23 April 2011

स्त्रीभ्रुण हत्त्या.

भ्रुण
मुलींची संख्या रोडवण्याची अनेक कारणे आहेत. मुख्य कारणे तीन प्रकारात मोडतात. पहिले धार्मिक, म्हणजे वंश टिकवणे, धार्मिक कर्माचा अधिकार फक्त्त मुलालाच वगैरे. दुसरे आर्थिक म्हणजे संगोपनाचा खर्च मुख्यतः शिक्षणा करता. तिसरे कारण लग्न जमवण्यात येणारे कष्ट व खर्च.
आणि इतके केल्यावर मुलगी उतार वयात आधार देऊ शकत नाही. गर्भजल परीक्षा हा एक मुलगी होऊच नये या करता वापरात असलेला एक उपाय आहे. स्त्रीभ्रूण हत्तेकरता गर्भजल परीक्षेला पूर्णपणे जबाबदार घरले जाते. परंतु, ते एकच कारण नाही. गर्भजल परीक्षेवर नियमाची कडक अंमल बजावणी केली म्हणून मुलींची संख्या वाढेल असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. राजस्थान मध्ये जल्मलेल्या मुलीना मारले जाते. ही परीक्षा बंद केली तर सर्वत्र असेही होऊ शकते.
धार्मिक भावना बदलण्या करता शिक्षण महत्त्वाचे आहे. या भावना बदलण्याचे काम धार्मिक नेत्यानी मनावर घेतल्यास खूप लवकर व कमी खर्चात तसेच कमी श्रमात होईल. तेव्हा धार्मिक गुरूना शिक्षण देणे हे महत्त्वाचे व अत्यंत आवश्यक आहे. बदललेल्या परिस्थितीनुसार मुलीना सर्व धार्मिक कृत्याना योग्य समजले पाहिजे. कुटुंबातील जेष्ठ मुलाला जे अधिकार आहेत ते मुलीला ती मुला पेक्षा वयाने मोठी असेल तर मिळाले पाहिजेत. मुलीना मासिक पाळी असेल तर अस्पृश्य समजू नये. बदलेल्या परिस्थितीत, अशा काळात स्वच्छ राहण्या करता उपाय आहेत. तेव्हा अशा परिस्थितीत सुद्धा धार्मिक विधी करण्यास अटकाव नसावा. धार्मिक गुरूनी हे मान्य केले तर समाजही मान्य करेल. हा मोठा अडसर दूर झाला तर इतर अडथळे दूर करणे सोपे होईल.
वंश टिकवणे ही एक संकल्पनाच आहे. तिचा उगम मनुष्य प्राणी धरतीवर टिकून राहावा म्हणून ज्ञानी लोकानी त्या वेळच्या परिस्थितीनुसार लोका मध्ये रुजवली. सद्य परिस्थिती उलट आहे. माणूस टिकवण्या करता जनन वेगावर मर्यादा आणण्याचा आहे. प्रत्येकाचा वंश टिकणार आहे. एका गोत्रातील किंवा आडनावाचे लक्षावधी लोक आहेत. तेव्हा या बद्दल कोणालाच काळजी करण्याचे कारण नाही, निदान पुढील शंभर वर्षे तरी.
मनुष्य प्राणि हा सर्वात स्वार्थी आहे. प्रत्येक कर्म गुतवणुकीच्या नजरेने पाहतो. मुुलांच्या संगोपनात ही वृत्तीच असते. मी संगोपन व्यवस्थित केले तर मुलगा मला म्हातारपणी आधार ठरेल हा स्वार्थ असतो. सध्याच्या समाज व्यवस्थेत मुलगी आधार देऊ शकत नाही. म्हणून मुलगा पाहिजेच ही वृत्ती जोपासली जाते. मुलगी म्हणजे फक्त्त खर्च. परतवणुक न देणारी गुंतवणुक. आता या करता कायदे केले आहेत. मुलीना वारसा हक्काने संपत्ती मध्ये हिस्सा आहे. मुलाने आई-वडिलांचा सांभाळ केला पाहिजे. हुंडा घेणे व देेणे गुन्हा आहे वगैरे. हे कायदे पाळण्या करता समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. मुलीनी प्रत्यक्षात तिच्या आई-वडिलांना म्हातारपणात सांभाळले पाहिजे.
व्यवस्थापनाचा एक छान धडा आहे. पूर्ण विचार न करता अडथळा पार करण्याकरता धडपड केली तर प्रश्न सुटत नाही व वेळ वाया जातो. स्त्रीभ्रुण हत्त्येचा प्रश्नही पूर्णपणे समजुन घेऊन हाताळला जात नाही. सात आंधळ्यानी हत्तीचे वर्णन केले तर प्रत्येकाचे वर्णन वेगळेच असणार. ते एकत्र केले तर ते पूर्ण असु शकेल. हत्त्येची कारणे जशी धार्मिक आहेत तशी आर्थिक ही आहेत. धर्म स्त्रीला पुरुषाचे अधिकार नाकारतो तसेच मुलीवर केलेल्या खर्चाचा परतावा तिच्या आई वडिलाना मिळत नाही. ही हत्त्या टाळावयाची असेल तर सर्वांगाने उपाय केले पाहिजेत. धर्मगुरुनी स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने हक्क द्यावेत, सरकारने मुलीना संपूर्ण शिक्षण मोफत द्यावे व मुलीवर आई वडिलांची जबाबदारी बंधनकारक करावी. समाजाने हुंडा पद्धत बंद करुन पूर्ण नांव लिहण्याची पद्धत बदलावी. व्यक्तीचे स्वतःचे नांव, तिच्या आईचे नांव व शेवटी तिच्या वडिलांचे नांव. लग्न झाल्यावर सुद्धा नांव बदलु नये.
मुलगा वंश चालवतो!

मुलगी जन्मली तर तिला दगडावर आपटुन मारण्याची प्रथा अजुनही अस्तित्वात आहे. पूर्वी कामाच्या विभागणीच्या हिशेबाने पुरुषाचा मृत्यु होण्याची शक्यता अधिक. त्यामुळे मनुष्यजात टिकण्याकरता मुलगा वंश चालवतो हा नियम परिस्थितीनुरुप बनवला. धार्मिक आधाराचे कारण एवढेच की तो खात्रीशीरपणे व विनासायास पाळला जाण्याची शक्यता अधिक. परंतु सध्या परिस्थिती वेगळी आहे. स्त्रियांची शारिरीक ताकद कमी असली तरी काम करण्याची क्षमता कमी नाही. पुरुषांच्या मृत्युचे प्रमाण स्त्रियांच्या मृत्युच्या प्रमाणाएवढेच आहे. म्हणुन मुलगा वंश चालवतो हा विचार आता कालबाह्य झाला आहे.

मुलीचे लग्नानंतर नांव बदलते!

लग्न झालेवर मुलगी सासरी जाते व तिचे नांव बदलले जाते. सध्याच्या काळात चिमणा चिमणी वेगळेच घरटे बांधतात. मुलगी घर सोडते हे जितके खरे आहे तितकेच हल्ली मुलगा घर सोडतो हे ही खरे आहे. सद्य परिस्थितीप्रमाणे मुलीला नांव बदलण्याची आवश्यकता राहिली नाही. नांव लिहण्याच्या प्रथेत सुधारणा करुन हे साध्य करता येईल. स्त्री व पुरुष दोघांचीही नांवे सुधारित पद्धतीने लिहावीत. नांव लिहण्याची पद्धत वेळोवेळी बदली आहे. म्हणुन सध्याच्या सोईप्रमाणे बदलण्यास हरकत नसावी. प्रथम स्वतःचे नांव नंतर आईचे नांव व शेवटी वडिलांचे नांव अशी पद्धत वापरावी. उदाहरणार्थ गणेश पार्वती शिवशंकर, राम कौशल्या दशरथ, सीता धरणी जनक, इंदिरा कमला जवाहर, राहुल सोनिया राजीव वगैरे.
-->अधिक माहिती येथे मिळेलः Standardisation of Name System:

स्त्री हे परक्याचे धन!

स्त्री हे परक्याचे धन हा समज जेंव्हा निर्माण केला तेंव्हा बरोबरच होता. स्त्रीला स्वतःची उत्पन्नाची साधने नव्हती. स्त्री ही पुरुषाची संपत्ती मानली जात होती. कोणी दुसरा पळवुन नेईल या भितीने तिला घरात बंदिस्त करुन ठेवले जाई. समाजाशी तिचा फारसा संबंध नसल्यामुळे व शिक्षणापासुन वंचित ठेवल्यामुळे स्त्रिला संरक्षणाकरता आधार आवश्यक होता. आता आपण स्त्रीला मोकळ्या जगात वावरायला परवानगी दिली. वारसा हक्क दिला. कायदे केले. मग ती परक्याचे धन का? जे स्वतःला धर्माचे रक्षक समजतात ते या वर उपाय योजना का करत नाहीत? सर्व धर्माच्या धर्मगुरुना धडा शिकवण्याची जबाबदारी स्वतःला सुशिक्षित, सुसंस्कृत, शहाणे समजणारांची आहे.

आई!

10 मे हा दिवस अमेरिकेमध्ये 'मदर्स डे' म्हणजे 'मातृदिन' म्हणून साजरा केला जातो. 11 तारखेच्या वर्तमानपत्रातील एका बातमीने माझे लक्ष वेधले. शाळेच्या दाखल्यात नांव लिहताना आईचे नांव सुद्धा जोडले गेले. आईचे नांव जोडले गेले ही चांगली गोष्ट आहे. कांही स्त्रिया नांवामध्ये माहेरचे आडनांवही लावतात. परंतु, यामुळे नांवाची लांबी वाढते. त्यावर उपाय आहे. नांव लिहताना प्रथम स्वतःचे नांव नंतर आईचे नांव व शेवटी वडिलांचे नांव. यामुळे आडनांव लिहण्याची आवश्यकता राहणार नाही, लग्न झाल्यावर नांव बदलण्याची आवश्यकता जवळ जवळ शून्यवत होईल. याच बरोबर प्रत्येक व्यक्तीला 20 अंकी क्रमांक द्यावा. हा क्रमांक असा असावा की त्या व्यक्तीकरिता तो एकमेव ठरावा. त्याच बरोबर लक्षात ठेवण्यास सोपा असावा. मला असा क्रमांक ठरविण्याची एक युक्ती सुचते. प्रथम 6 आकडे जन्मठिकाणाचा पोस्टल कोड (पिन क्रमांक) तद्नंतर 8 आकडी जन्मतारीख व शेवटी 6 आकडी जन्मवेळ. हा क्रमांक इतराना लक्षात ठेवण्यास अवघड असला तरी त्या व्यक्तीच्या लक्षात राहू शकतो. या पद्धतीचे अनेक फायदे आहेत. आशा आहे सवांर्ना हे आवडेल.

बलात्कारित स्त्री न्यायालयात जाईल काय?

बलात्कार झाला हे सिद्ध करण्याची जबाबदारी कायद्याने बलात्कारित स्त्री वर टाकली आहे. समाज याला व्यभिचार समजतो. व्यभिचारी स्त्री बरोबर कोणीही पुरुष लग्न करण्यास तयार नसतो. अशा स्थितीत स्त्री पुढे दोन पर्याय. एक तर आयुष्यभर मानहानीचे जिणे जगणे अन्यथा आत्महत्या करणे. समजा बलात्कार सिद्ध झाला तर पुरुषाला शिक्षा काय तर थोडा दंड व काही महिने तुरुंगवास.  मग सांगा कोठली स्त्री बलात्कार झाला म्हणुन तक्रार करेल? नोंद होणाऱ्या गुन्ह्यामध्ये एक तर स्त्रीचा मृत्यु झालेला असतो किंवा तिसऱ्या कोणी पाहिला असतो. स्वतःला धर्मरक्षक म्हणवणाऱ्यानी बलात्कार म्हणजे व्यभिचार नव्हे हे समाजाच्या गळी उतरवले पाहिजे व पुरुषाला धर्माबाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे. अशा पुरुषाला फाशीची शिक्षा सौम्यच समजली जावी.

लैंगिक स्वातंत्र्य!

पुरुषाला लैंगिक स्वातंत्र्य गृहित धरले जाते. पाश्चात्य देशात स्त्री करताही हे गृहित धरले जाते. परंतु असे स्वातंत्र्य दिल्यामुळे समाजापुढील प्रश्न सुटतात असे दिसत नाहीत. भारतीय विचारधारेमध्ये तसेच निरनिराळ्या धर्मांच्या विचारधारेमध्ये लैंगिक स्वतंत्र्य ना पुरुषाला आहे ना स्त्रीला. हजारो वर्षांच्या अनुभवातुन हाच विचार योग्य वाटतो. लग्नाबाहेरील लैंगिक संबंधाना शिक्षा झाली पाहिजे. त्या करता कायदा करण्यास खूप चर्चा झाली पाहिजे. असे संबंध सहमतीने असोत अगर बळजबरीने असोत याला बलात्कारच म्हटले पाहिजे. बलात्कार स्त्री सुद्धा पुरुषावर करु शकते हे ही ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. मासिकपाळी मध्ये स्त्रीला शुचिर्भुत समजत नाहीत. ज्या वेळी हा नियम बनवला तेव्हा 100 टक्के योग्य होता. परंतु स्वच्छता राखण्याकरता सध्या नॅपकीन उपलब्ध आहेत. ते वापरुन स्त्रिया घरची व कार्यालयातील कामे करतात. हा बदल आपण स्वीकारला. मग पुजा अर्चा उपासना करु द्यायला काय हरकत आहे? हे स्वीकारायचे नसेल तर 4 दिवस पूर्णपणे विश्रांती द्या. बाकी सर्व कामे करण्यास मज्जाव करा.
असे झाले तर मुलगी हे ओझे वाटणार नाही व मुलींची संख्या नैसर्गिग प्रमाणात राहील.

3 comments:

डॉ.सुनील अहिरराव said...

चांगला लेख!

Jana said...

@ डॉ.सुनील अहिरराव, धन्यवाद. एक विनंती. माझ्या निवेदन बरोबर वाटत असाल तर त्यावर सही करा व आपल्या सर्व मित्रमैत्रिणीना तसेच नातेवाईकांना सही करण्याचा आग्रह कराः http://www.change.org/petitions/save-democracy
आणखी माहितीसाठी येथे पहाः http://janahitwadi.blogspot.com/2011/11/petition-save-india.html

Madhav Bamne said...

देशामध्ये पाऊस नसल्याने दुष्काळाचे संकट दृष्टीपथात आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून मुलींचा जो दुष्काळ पडलाय त्यावर मात्र थातुर मातुर पट्टी बांधली जात आहे. त्यावर रामबाण उपाय अजुनही दिसत नाही. एकापेक्षा जास्त उपाय लागतील. हे संकट केवळ एकच उपाय करून दूर होणार नाही. येथे मला कांही उपाय दिसले. http://janahitwadi.blogspot.in/2011/04/blog-post_6827.html ते व त्यामध्ये मी थोडी भर घातलेले उपाय खाली देत आहे.
उपायः
1. व्यक्तिचे नाव लिहण्याची पद्धत बदलावी. ती अशीः प्रथम व्यक्तिचे नाव, नंतर व्यक्तिच्या आईचे नाव व शेवटी व्यक्तिच्या वडिलाचे नाव. लग्न झाल्यावर यात बदल करू नये. या पद्धतिमुळे वंशाचा दिवा हा प्रश्न सुटेल. मुलगा व मुलगी दोन्हीही वंशाचे दिवे (किंवा पणती) म्हणून मान्य होतील.
2. शासनाने मुलींना मोफत शिक्षण द्यावे. या मध्ये राहणे, जेवणखाण, कपडेलत्ते, सर्व प्रकारचे शुल्क, पुस्तके इत्यादी सर्व गोष्टींचा समावेश असावा. त्याकरिता उत्पनाची मर्यादा नसावी. शेवटी शासन जनतेचाच पैसा खर्चून हे करणार. तेंव्हा मुलींमध्ये उत्पन्नावरून भेदभाव करू नये.
3. स्वयंसेवी संस्थांनी पालकाना नको असलेल्या मुलींना दत्तक घ्यावे. त्यांना त्याचे लग्न होई पर्यंत सांभाळावे शिकवावे.
4. सर्व धर्मांच्या (जातीच्याही) पुजाऱ्यांना अंडासेलमध्ये एकत्र कोंडून ठेवावे. जो पर्यंत ते मुलांना असणारे सर्व हक्क मुलींना देण्यास तयार होत नाहीत व तसे जाहीर करत नाहीत तो पर्यंत त्यांची सुटका करू नये.
5. वरील उपायांनी मुलींचा दुष्काळ संपेल. याउपर गरज भासली तर गर्भलिंग चाचण्यांवर बंदी अशा प्रकारचे इतर उपाय करावेत.

Popular Posts