Tweet

Saturday 23 April 2011

राज ठाकरेंचे दंगलराज!

खालिल लेख येथे वाचता येतील. त्या करिता खाली स्क्रोल करावे.
  1. हत्ती व आंधळे
  2. राज ठाकरेना मराठी माणसांचा पुळकाः
  3.  उत्तर भारतीय व महाराष्ट्र.
  4.  मराठी  टिकवण्याची आवश्यकता व उपाय:
  5.  विभागीय साहित्य संमेलनाची आवश्यकता
पक्ष स्थापनेमध्ये 'महाराष्ट्र नवनिर्माण' हा मुद्दा पकडून मनसेची स्थापना झाली. तरुणाना पोट्यापाण्याची संधी मिळवून देणे हा म्हणूनच एक महत्वाचा मुद्दा आहे. राज्यातील नोकऱ्या इतर प्रांतांतील तरुणाना मिळाल्या तर स्थानिकाना त्या नाकारल्यासारखेच आहे. म्हणूनच मनसेला आंदोलन करणे भाग पडले. अशा स्थितीत शासनच अशा आंदोलनाला आमंत्रण देत आहे असेच म्हणावे लागेल. या आंदोलनाला कारणीभूत असणारे सर्व एकाच मंत्राचा जप करताना दिसतात. भारतामध्ये भारतीयाना कोठेही नोकरी करण्याचा हक्क आहे.
परंतु, जाणीवपूर्वक इतर राज्यातील तरुणाना येथे आणून नोकऱ्या दिल्या जातात या बाबत सर्वानी तोंड बंद ठेवले आहे. अगदी मराठी आमदार व खासदारानी सुद्धा. एकटे मनोहर जोशीच हा मुद्दा मांडताना दिसतात. इतर सर्व लालूंचा मुद्दा आळवताना दिसतात. मराठी आमदार खासदार सर्वच उत्तरप्रदेश तसेच बिहारच्या शासनाला शरण गेल्याचे दिसतात.
तसे पाहिले तर मराठी वर्तमानपत्रात जाहिरात का दिली नाही या मुद्यावर लालूना सर्वानी जाब विचारला पाहिजे. भाजप नेहमी 'त्यानी अमूक केले म्हणून आम्ही तमूक केले' हा मंत्र आळवतो. त्यांचा सिद्धांत येथे वापरला तर राज ठाकरे पूर्णपणे निर्दोष आहेत हे सिद्ध होईल. भाजपचा मराठी खासदार हे मानावयास तयार दिसत नाही. संभवता कोठलाही राजकीयपक्ष हे मानण्यास तयार नाही. याच्या परिणामाचा विचार कोणी केला आहे काय? तमीळनाडुतील प्रादेशिकपक्ष एल टी टी ई सारख्या आतंकवाद्यांचे समर्थन करतात, त्याना वाचवावे म्हणून केंद्रशासनावर दबाव आणतात. परंतु, त्याविरुद्ध एकाही राजकीयपक्षाने आवाज उठवला नाही. याचा अर्थ जे होत आहे ते फक्त निवडणुक जिंकण्याकरता होत आहे. त्यावर उपाय म्हणजे महाराष्ट्रातील सर्व मतदारानी तथा कथित राष्ट्रीयपक्षाना निवडणुकीत धूळ चारली पाहिजे.
हा प्रश्न मुळातून सोडवायचा असेल तर रोजगार संधी वाढवल्या पाहिजेत. रोजगार केंद्रे सक्षम केली पाहिजेत. रोजगार केंद्रातील भ्रष्टाचार संपुष्ठात आणला पाहिजे. इंटरनेटसारखे माध्यम रोजगार केंद्रे सक्षम करण्यात व तेथील भ्रष्टाचार निपटून काढण्यास बहुमोल मदत करू शकते. प्रत्येक राज्याने इंटरनेटवर बेकार तरुणांना नोंदणी करण्याची सुविधा निर्माण करून दिली पाहिजे. नोंदणी झाल्यावर कागदपत्रांची तपासणी करून उमेदवारांची यादी इंटरनेटवर उपलब्ध झाली पाहिजे. त्याकरता निश्चित कालावधी आखला पाहिजे. हे काम ठरवलेल्या कालावधीत पूर्ण झाले नाही तर रोजगार केंद्राच्या कर्मचाऱ्याना जाब विचारला पाहिजे. ज्याना कर्मचारी पाहिजेत त्यानी त्या राज्याच्या वेबसाईटवरून रिक्त जागांच्या सहापट उमेदवाराना मुलाखत, परिक्षेकरता बोलावले पाहिजे. एक जागा व हजारो उमेदवार हा पायंडा नष्ट केला पाहिजे. जर बोलावलेल्या उमेदवारातून सक्षम उमेदवार न मिळाल्यास पुढील उमेदवाराना बोलवावे. ही पद्धत वापरली तर वेळ वाचेल, अपेक्षित उमेदवार कमीत कमी वेळात निवडता येईल व राज ठाकरे सारख्यांना आंदोलन करण्याची संधीच मिळणार नाही.

हत्ती व आंधळे

आंधळ्यांना हत्ती समजावा म्हणून एक हत्ती आणला. आंधळे हत्तीला हात लावून त्याला समजाऊन घेऊ लागले. कोणी शेपटी पकडली तर कोणी पाय, तर कोणी सोंड तर कोणी कान. ज्याच्या हाती जे लागले त्यावरून हत्ती कसा असतो ते प्रत्येकजण सांगू लागला. कोण म्हणाला दोरी, तर कोणी खांब तर कोणी सूप. प्रत्येकाने त्याला समजले तसे हत्तीचे वर्णन केले. राज ठाकरेच्या आंदोलनाबाबत हेच होत आहे. 40 वर्षापूर्वीच हा मुद्दा आम्ही घेतला. राज ठाकरेने आमचा मुद्दा पळवण्याचा प्रयत्न करू नये. तसे पाहिले तर 40 वर्षांत हा मुद्दा निकालात का लागला नाही? या बद्दल मात्र काहीही बोलत नाहित. दुसरा उठतो व शहाणपणाचा आव आणून म्हणतो, मुद्दा बरोबर पण मार्ग चुकीचा. महात्मा गांधींच्या देशात सर्व शांततेत झाले पाहिजे. कोणी सांगू शकेल की, महात्म्याने ज्या पक्षाची सेवा केली त्या पक्षाचे नेते व सदस्य तरी शांततेच्या मार्गाने जातात काय? शांततेच्या मार्गाने कोठल्या राजकारण्याने कोठले कोठले प्रश्न सोडवले? उपरा उठतो व गरजतो मी भारतीय आहे. मी भारतात कोठेही जाऊन पोट भरू शकतो. घटनेने हा अधिकार मला दिला आहे. घटनेवर एवढी श्रद्धा आहे तर तुझ्या गांवात तुला रोजगार मिळत नाही याचा विचार केलास? घटनेने किमान वेतनाची हमी दिली आहे. त्याच्या निम्म्यापेक्षा कमी वेतनावर काम का करतोस? तुला महाराष्ट्र, गुजरातच का दिसतात? तमीळ नाडुत का जात नाहीस? बंगालमध्ये गेल्यावर बंगाली का शिकतोस? बरोबर राजकारण्यांना का आणतोस? आणखी कोणी उठतो व गरजतो परप्रांतीयांना दहशतीमुळे परत जावे लागले. आम्ही 15-20 वर्षापूर्वीच कायदे केले. 80 टक्के रोजगार स्थानिकांना द्यावा, दुकानांच्या पाट्या इंग्रजीबरोबर मराठीत लावाव्या. कायदा केला म्हणून स्थानिकाना रोजगार मिळाले? पाट्या मराठीत लागल्या? हे झाले नाही म्हणून जर आंदोलन छेडले तर त्याला माथेफिरू का म्हणतोस? हा राजकीय फायदा उठवण्याचा उद्योग आहे असे म्हणून त्याची हेटाळणी का करतोस? कोणी सांगतो, सर्व विकासकामे ठप्प पडली. यामुळे भाववाढ झाली. राज्यात कायदा असताना परप्रांतीयांना कामावर ठेवलेसच का? ते 30 रुपयात दिवसभर काम करतात म्हणून? एवढ्या रोजंदारीवर एका कुत्र्याचे तरी पोट भागेल काय? याचा विचार केलास? पोट भागत नाही म्हणून त्यानी चोऱ्या केल्या, घाणीत राहिले, अर्धपोटी राहिले तर तुला चालते? झोपडपट्ट्या वाढल्या तर तुला चालते? मराठी विद्वान म्हणतो भारतामध्ये प्रांतीयतेला स्थान नाही. मग काय जे भारताला राष्ट्र मानीत नाहीत त्यांची हांजी हांजी करणाऱ्यांला स्थान आहे? हिंदूना मुसलमांना विरूद्ध व ख्रिचनांविरूद्ध पेटवणाऱ्यांना व त्या आगीत स्वतःची पोळी भाजणारांना स्थान आहे? अशाना तू राष्ट्राचे शत्रू समजतोस? कोणी गरजतो मी मुंबईत छटपूजा करीनच. ही छटपूजा मुंबईतच का? त्या करता लाखो लोक मुंबईत का? हजारो वर्षे प्रत्येकजण स्वतःच्या गांवी, गंगाकिनारी पूजा करतो. मग आताच मुंबईतच का? लोकाना हजारो किलोमीटर दूर आणून विनाकारण पैसे का वाया घालवतोस? त्यांना जगन्नाथपुरी, गुवाहाटी, काशी, द्वारका, कन्याकुमारी, कोची अशा इतर ठिकाणी का नेत नाहीस? मुंबई काय तीर्थक्षेत्र आहे? टीव्हीवाल्यांनी तर कमाल केली. ज्याची ओळख गल्लीच्यापुढे नव्हती त्याची ओळख दिल्लीपर्यंत वाढवली. नायक असो अगर खलनायक प्रसिद्धी दोघानाही मिळते. रावणाला भारतीय खलनायक समजत असले तरी लंकेत तो नायकच आहे. याचा विसर केवळ मठ्ठानांच पडू शकतो. रात्रंदिवस, तासोनतास तीच तीच चित्रे व तेच तेच आख्यान दाखवून जसे काय देशात फक्त एकच प्रश्न शिल्लक आहे अशी लोकांची धारणा करून दिली. तथाकथित विद्वानांच्या मुलाखती दाखवल्या. लोकाना टेलीफोनवरून प्रश्न विचारण्यास लावले. असम मधून एकाने विचारले. पाटण्यात एका असम मधील मुलीवर बलात्कार झाला. विद्वान गुळमळीतपणे एवढेच म्हणाले 'ड' वर्गातील नोकरीकरता स्थानिक लोकाना प्राधान्य द्यावे. लगेच टीव्हीवर 'ब्रेक' झाला. ब्रेकनंतरसुद्धा त्या प्रश्नावर त्या विद्वानाने कांहीही सांगितले नाही. निवेदिका अशा तोऱ्यात बोलत होती कि, पानिपतवर जीवनमरणाची लढाई चालू आहे. कोणी माथेफिरू येतो. राज ठाकरेला मारावयाचे म्हणतो व सार्वजनिक बसचा कब्जा घेण्याचा प्रयत्न करतो. पोलिसांनी त्याला मारले व बसमधील प्रवाशांचे जीव वाचवले. बिहारी नेते म्हणतात त्याला पकडले का नाही. त्याच्या घरी मुख्यमंत्री जातो. तो काय युद्धातील हुतात्मा होता काय? टीव्हीवाले म्हणतात त्याला पकडता येणे शक्य होते. हातात भरलेले पिस्तूल असणाऱ्या विवेकशून्य माणसाला पकडता येईल काय? या टीव्हीवाल्यांना मराठी माणसे पूरग्रस्ताना मदत करताना का दिसत नाहीत? पाटण्यामध्ये रेल्वेला आग लावलेली का दिसत नाही? त्यावर माकडचेष्टा का करत नाहीत? बिहारी कष्टकरी जनतेला राज ठाकरे राक्षस वाटत असला तरी मराठी कष्टकऱ्याला तो देव वाटतो हे लक्षात का घेत नाहीत? हे सर्व होत आहे ते केवळ राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे. बिहारी तसेच मराठी राजकारण्यांना हे समजले पाहिजे. नक्षलवादी, मावोवादी, अतिरेकी भारतभर धुमाकूळ घालत आहेत. त्यांच्या विरोधात कोठलेहीे नेते एकत्र आले नाहीत. पंतप्रधानांवर दबाव आणला नाही. राज ठाकरे या वाद्यांच्यापेक्षा जास्त घातक आहे काय? त्याच्यावर कारवाई केली तर भारतात शांती प्रस्थापित होईल काय? असम मधील संघटना बंगलादेशी अतिरेक्यांची मदत घेत आहेत. तमीळ नाडुतील नेते प्रभाकरनला मदत करू म्हणतात. हिंदुत्त्ववादी संघटना लष्कराला बाटवत आहेत. अमिष दाखवून धर्मांतर होत आहे. या मुद्यावर सर्वपक्षीय नेते एकत्र का येत नाहीत?

राज ठाकरेना मराठी माणसांचा पुळकाः

राज ठाकरेनी मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारुन देशभरातील मधमाशाना डिवचले. त्यानी असे का केले? याचा विचार करण्याऐवजी जे केले ते केले पाहिजे होते काय? हे पाहणे महत्वाचे आहे. कारखानदार तसेच बांधकाम व्यवसायिक म्हणतात कामे बंद पडली. महाराष्ट्रात कामगारांची कमतरता आहे काय? बाहेरुन कामगार आणण्याची अवश्यकता काय होती? केवळ त्यांची पिळवणुक करण्याकरता? त्यानी कामगारांच्या सुरक्षितेकरता काय केले? त्याना मराठी समाजात मिसळुन घेण्याकरता काय केले? त्याना मराठी शिकवले काय? राष्ट्राभिमानाचा आव आणणारे म्हणतात भारत एक देश आहे. कोणीही कोठेही येऊ जाऊ शकतो. कोठेही काम करु शकतो. याचा अर्थ विशेष प्राविण्य न लागणाऱ्या कामाकरता सुद्धा लोकानी काम शोधण्यासाठी 1।।-2 हजार किलोमिटर जावे? चोऱ्या करत मुक्त संचार करावा? पुढाऱ्यानी मूळ रहिवासाच्या ठिकाणी रोजगार निर्मिती करु नये? मराठी पुढारी म्हणतात 'परप्रांतियांचे रक्षण करु' त्यांच्या मध्ये सत्य सांगण्याची हिम्मतच नाही. समाजसेवक म्हणतात 'बाबा रे जाऊ नका. आम्ही तुमचे रक्षण करु.' कशाकरता व कोणापासुन हे रक्षण करणार? प्रश्न निर्माण केला उत्तरप्रदेश व बिहार मधल्या अशा  पुढाऱ्यानी ज्याना  त्यांच्या घरी  कोणीच भीक घालत नाही. आपली मतपेढी बनवण्याच्या गरजेपाई उत्तरभारतीयाना महाराष्ट्रात एकत्र करण्याचा हा डाव आहे. त्यांची ही खेळी यशस्वी झाली तर मुंबई हे स्वतंत्र राज्य होण्यास वेळ लागणार नाही. मुंबईराज्याचे मंत्री होण्याचे त्याना डोहाळे लागले आहेत. (अशा पुढाऱ्यानी निदान उत्तरभारतीयाना मराठी शिकवुन येथे पाठवले असते तरी एकवेळ चालले असते.) या चालीला भोळे भाबडे मराठी पुढारी बळी पडत आहेत. राज ठाकरेनी समजा स्वार्थापायी हा मुद्दा उपस्थित केला असला, तरीही इतरानी म्हणजे समस्त मराठी माणसानी एकजुट राखुन परप्रांतिय पुढाऱ्यांचा बेत अयशस्वी केला पाहिजे. त्याच बरोबर मराठीतुन सर्व व्यवहार करु इच्छिणाऱ्या सर्वाना मदत केली पाहिजे. हा मुद्दा ज्याना स्वतंत्रपणे हाताळयाचा आहे त्यानी तसे करावे पण उगीच उत्तरभारतीयाना जाण्यापासुन रोखु नये. उलट लवकरात लवकर जाण्यास मदत करावी. ते गेल्यामुळे निर्माण होणारी पोकळी भरुन काढण्यास महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात जाऊन मराठी लोक आणावेत. सर्व शहरात मराठीतुन व्यवहार होईल याची काळजी घ्यावी. सोपा उपाय आहे. बेरोजगाराना एक वेबसाईट बनवुन तीवर नोंदणी करण्यास सांगावे. निरनिराळ्या राजकीय पक्षाच्या कार्यर्कत्यानी तालुका पातळीवर नोंदणी करण्यास मदत करावी. ज्या ज्या कारखान्याना कामगार पाहिजेत त्यानी या वेबसाईट वरुन कामगार शोधावेत व त्याना कामावर नेमावे. खरे पाहिले तर हा मुद्दा हातात घेण्यापुर्वीच राज ठाकरेनी हे करावयास पाहिजे होते. तरी पण वेळ गेली नाही. लवकरात लवकर हे झाले पाहिजे.
उत्तर भारतीय व महाराष्ट्र.

नुकत्याच झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुक प्रचार सभेत एक खासदार म्हणाल्या की, उत्तर भारतीयाना महाराष्ट्रात अडचणी येत असतील तर त्यानी परत जावे. तर दुसरे खासदार म्हणाले की, आपली संस्कृती जपताना महाराष्ट्रीयन संस्कृती अंगिकारावी. महाराष्ट्र म्हणजे मोठे राष्ट्र. या राज्याची सर्व भारताला सामाऊन घेण्याची शक्ती आहे. येथे आगगाडीच्या डब्याची आठवण येते. गाडीत बसलेले फलाटावरच्या लोकानी आत येऊ नये म्हणून जोरदार विरोध करतात. हेच लोक गाडीत घुसल्यावर बाकी फलाटावरील लोकाना असाच विरोध करतात. महाराष्टात सध्या वास्तव्य करणारे बहुतेक केंव्हाना केंव्हा बाहेरूनच आले आहेत. फरक एवढाच की सध्या घुसणारे महाराष्ट्राच्या संस्कृतीची पर्वा करत नाहीत. मराठी भाषा शिकत नाहीत. स्वतःची संस्कृती व भाषा येथे वास्तव्य असलेल्या लोकावर लादतात. हे बदलले पाहिजे. खासदारानी व इतर सर्वानी गाडीत नव्याने बसणाराना बजाऊन सांगितले पाहिजे की, प्रथम मराठी शिका, मराठीतून सर्व व्यवहार करा, जुनी ओळख विसरून जा व पूर्णपणे महाराष्ट्रीन व्हा. असे झाले तर विरोधाचे मूळच नष्ट होईल.

मराठी  टिकवण्याची आवश्यकता व उपाय:

मराठीचा वापर दिवसें दिवस कमी होत आहे. आधी हिंदीचे आक्रमण झाले. मराठी बोलण्या पेक्षा मोडकी तोडकी हिंदी बोलण्या कडे लोकांचा कल वाढत आहे. आंतर राष्ट्रीय तसेंच ज्ञान भाषा म्हणून इंग्रजीचे महत्त्व वाढत आहे. मराठी शाळेत पहिली पासून इंग्रजी शिकवण्यास सुरवात झाली आहे. उत्तर भारतीयांचे लोंढे फक्त मुंबईतच नाही तर महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या सर्वच शहरात येत आहेत. अशा परिfस्थतीत मराठी भाषा टिकेल काय? माझ्या मते आपणाला मराठीचा अभिमान असेल तर मराठी अवश्य टिकू शकते. इंग्रजी सर्व जगाने स्वीकारली तरी. अगदी महाराष्ट्रात उत्तर भारतीयांची सख्या दहापट झाली तरी. त्या करता इतिहासात डोकाऊन पाहण्याची गरज आहे. इतिहासापासून शिकून पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

जगामध्ये इंग्रजी जाणणाऱ्या लोंकाची संख्या हिंदीच्या खालोखाल आहे, इंग्रजी  ही ज्ञानभाषा आहे. इंग्रजी  वर प्रभुत्त्व असणाऱ्या लोकांचे विश्व मोठे आहे. इंग्रजी  वर प्रभुत्त्व असणाऱ्या लोकांना जागतिक स्तरावर रोजगार धंद्याची संधी खूपच आहे. इंग्रजी  वर प्रभुत्त्व असणाऱ्या लोकांना अमेरिका, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया तसेंच कांही आफ्रिकी देशामध्ये मान मिळतो. हे आणि असेच कांही मुद्दे वादातीत आहेत. परंतु, म्हणून भारतातील प्रत्येक व्यक्तीने इंग्रजीवर प्रभुत्त्व मिळवले पाहिजे हे हास्यास्पद आहे.
भारतातील प्रत्येक व्यक्तीला परदेशात काम धंद्याला जाण्याची गरज नाही. भारतातील प्रत्येक व्यक्तीला फक्त इंग्रजीतच उपलब्ध असलेल्या ज्ञानाची आवश्यकता नाही. सघ्याच्या संगणक युगामध्ये, ज्या गोष्टीचे ज्ञान मराठी मध्ये सध्या नाही परंतु, बऱ्याच लोकाना ते आवश्यक आहे, असे ज्ञान मराठी मध्ये उपलब्ध करून देणे सहज शक्य झाले आहे. तेंव्हा निवडक लोकाना इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक आहे, परंतु सर्वाकरता गरजेचे नाही. या तत्त्वाचा स्वीकार करणे वादातीत असावे. या वर एक अक्षेप जरूर घेतला जाईल. मग हिंदी इंग्रजीचे काय? हिंदी इंग्रजी कडे दुर्लक्ष केले तर राष्ट्रीय व जागतिक चढाओढीत आपण मागे पडू. या करता व्यवहारातील 2 उदाहरणे घेऊ. वाहन चालक व न्यायालय. वाहनचालक होण्याकरता अभियांत्रिकीची पदवी असण्याची अजिबात आवश्यकता नाही. वाहन निर्माण करण्याकरता किंवा दुरुस्तीकरता अभियांत्रिकेचे ज्ञान आवश्यक आहे. न्यायालयात प्रत्त्येक पक्षकाराला कायद्याचे सखोल ज्ञान असण्याची गरज नाही. कांही थोड्या व्यक्तिना सखोल ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणून सर्वानी अभियांत्रिकी, कायदा वगैरे सर्वच्या सर्व ज्ञान आत्त्मसात करण्याची अजिबात गरज नाही. म्हणून ज्या व्यक्तिना गरज आहे त्यानीच हिंदी इंग्रजी चे सखोल ज्ञान संपादन करावे. इतराना जुजबी ज्ञान पुरेसे.
सध्या महाराष्ट्रात राहणारे व स्वतःला महाराष्ट्रीयन समजणारे सर्व केंव्हापासून महाराष्ट्रात राहतात? श्री छत्रपति शिवाजी महाराजांचे पूर्वज राजस्थानातून आले. कित्येक व्यापारी गुजराथ, राजस्थान, कर्नाटकातून आले. पूर्व मुख्यमंत्री मारुतराव कन्नमवारांचेे पूर्वज आंध्रातून आले. थोडक्यात महाराष्ट्रात आजच नाही तर पूर्वीपासून बाहेरून लोंढे येत आहेत. या मध्ये नाविन्य नाही. अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया वगैरे देशात सुद्धा असे लोंढे वाहतात. मग महाराष्ट्रात आले तर काय बिघडले? परंतु, महाराष्ट्रात नक्कीच बिघडते. कारण, इतर सर्व स्थलांतरीत जेंथे जातात तेथील भाषा आधीच शिकून जातात. त्या मुळे स्थानिक लोकाना त्याना सामावून घेण्यास कमी कष्ट पडतात. महाराष्ट्रात येणाऱ्या लोंढ्यामध्ये हाच फरक आहे. जुन्या काळी आलेल्या लोकानी मराठी भाषा शिकून त्यातूनच व्यवहार केले. त्यांच्या नंतरच्या पिढ्या उत्तम मराठी समजू बोलू लागल्या आणि ते येथीलच झाले. मराठी टिकण्याकरता स्थलांतरिताना मराठीत व्यवहार करणे भाग पाडले पाहिजे.
या करता कोलकत्त्याचे उदाहरण बोलके आहे. जे कांही तेथे दिसते ते बंगालीतूनच. जे ऐकू येते ते बंगालीतूनच त्या मुळे तेथे जो जाईल त्याला बंगाली आलीच पाहिजे. बंगाली येत नसेल तर दैनंदिन व्यवहार करण्यास कष्टच कष्ट. तीच परिस्थिती चेन्नईत व कांही वर्षानी दिल्लीत. हिंदी सिनेमा पंजाबी होत चाललाय. जी भाषा स्वरहीन वाटत असे त्याच भाषेतील गाणी आजची पिढी गुणगुणत असते. यातून धडा घ्यावा
येथे येणाऱ्या स्थलांतरीतामध्ये 'परक्या ठिकाणी आलो' ही भावना निर्माण होऊ देणे म्हणजे मराठी आत्मसात करण्यापासून त्याना परावृत्त करण्या सारखे आहे. मराठी शिकणे सोपे आहे हे त्यांचे वर बिंबवले पाहिजे. मराठी शिकण्यास प्रवृत्त केले पाहिजे. वेळ काढून त्याना मोफत शिकवले पाहिजे. त्यातून एकाच फलाची आशा धरावी की मराठी वापरणाराची संख्या एकाने वाढली. असे एक एक करून जोडत गेलो तर येथे अमराठी कोणीच राहणार नाही व मराठी भाषेला तारण कर्ता शोधण्याची जरूरी भसणार नाही. गरज आहे आपण सर्वानी सतत सर्व व्यवहार मराठीतून करण्याची. शासनाने सर्व कामकाज मराठीतून करण्याची.
खरोखरच मराठी भाषा आपण नेहमीच वापरली पाहिजे. इंग्रजी किंवा हिंदी कमीतकमी वापरावी. माझी आई इतरांच्या आई पेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे व असणारच. माझी आई मला चांगल्या प्रकारे व अचूक समजून घेते. तसेच मला स्वतःला समजणे सुलभ होते. म्हणून माझी मातृभाषा मला प्रिय आहे.  मराठी भाषेचा वापर वाढवावा. या मध्ये प्रत्त्येक मराठी माणूस व शासन दोघांचाही सहभाग आवश्यक आहे. शासनाने रामदास स्वामी प्रमाणे 'असा भूमंडळी कोण आहे जो मराठीयेच्या सेवका वक्र दृष्टी पाहे.' ही भूमिका घेतली पाहिजे व प्रत्त्येकाने मराठीचा वापर सर्वच व्यवहारात केला पाहिजे.
शाळे मध्ये 3 किंवा 4 वर्षे हिंदी इंग्रजी चे शिक्षण  पर्याप्त आहे.या योगे आपला शिक्षणावरचा खर्च कमी होऊ शकतो, आपली अfस्मता जपू शकतो, आपले संस्कार नविन पिढीला देऊ शकतो आणि यातून जगामध्ये आपली ओळख निर्माण करू शकतो. हे निवडक लोक किती असावेत याचा आडाखा बनवणे अवघड नाही. माझ्या अंदाजाने हा आकडा 10 टक्क्यापेक्षा कमी असावा. तेंव्हा निरनिराळ्या स्तरातील 10 ते 20 टक्के व्यक्तीना इंग्रजीत प्राविण्य मिळवण्यास प्रोत्साहन द्यावे व बाकीना मराठी मध्ये प्राविण्य मिळवण्यास मदत करावी.

विभागीय साहित्य संमेलनाची आवश्यकता.

प्रत्येक 12 कोसावर भाषा बदलते असे आपण आजवर मानत आलो. दळण वळणाच्या साधनात सुधारणा झाल्याने ही समजूत खोटी ठरत आहे. हळू हळू खेड्यात सुद्धा शहरातील भाषा समजली व बोलली जात आहे. असे असूनही विभागीय साहित्य संमेलनाची आवश्यकता भासत आहे. पूर्वी शिक्षणाचा प्रसार फार नसल्याने मराठी लेखक महाराष्ट्रभर परंतु, शहरात व थोडे महाराष्ट्रा बाहेर होते. त्या मुळे साहित्य संमेलन हे सर्व मराठी लेखकाना  एकत्र आणून त्यांच्यामध्ये साहित्य संवर्धनाकरता संवाद साधण्याचे व्यासपीठ होते. अशा संमेलनात पुरेश्या जागे अभावी नवख्या लेखकाना स्थान नसते. त्यामुळे नवीन लेखक घडवण्याकरता वेगळ्या व्यासपीठाची आवश्यकता आहे.
लेखन कला जन्मजात देणगी का प्रयत्नातून मिळवलेले सार्मथ्य, या बद्दल भिन्न मते असु शकतात. जरी ती जन्मजात देणगी असे मानले, तरी जसे हिऱ्याला पैलु पाडल्या शिवाय तो चमकत नाही तसे जन्मजात लेखकानाही चमकण्याची संधी आवश्यक आहे. असे लेखक फक्त ठराविक शहरात असू शकत नाहीत. ते कोठेही असतात. साहित्य संमेलन अशा हिऱ्याना खाणीतून काढून एखाद्या दालनात मांडू शकतात. जर हिरा खरा निघाला तर तो चमकेल नाही तर उकिरड्यावर फेकला जाईल.
दृकश्राव्य वाहिन्यावर कलाकार शोधण्याकरता विविध कार्यक्रम प्रसारित केले जातात. निरनिराळ्या व्यक्तीना गाण्याची, अभिनयाची संधी दिली जाते. परिक्षक त्यांचे गुणांकन करतात. त्यातून प्रत्येक वेळी सर्वगुणसंपन्न कलाकार मिळेलच असे नाही. तरी पण त्यांचे प्रयत्न चालूच राहतात, त्या मध्ये खंड पडत नाही. हे कार्यक्रम फक्त एकाच वाहिनीवर नसतात. सर्वच वाहिन्यावर प्रयत्न चालू राहतात. विभागीय साहित्य संमेलनाच उद्देश असाच आहे.
वर दिलेला, झाला पहिला दृष्टीकोण. इतरही द्ृष्टीकोण आहेत. मराठी सध्या तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे. इंग्रजीला ज्ञानभाषा समजले जाते, जसे काही इंग्रजी सोडून इतर भाषात ज्ञान नाहीच! परवा परवा पर्यंत परप्रांतियाशी बोलताना आपण हिंदी वापरत होतो. आता आपापसात हिंदीतच बोलतो, अगदी हिंदी येत नसले तरी. 'किधरकु जात्या' 'कायकु रोता' 'तुमको किधरकु जाना' 'हमारेको क्या मालुम' वगैरे वाक्ये हिंदी समजुन बिनदिक्कत पणे बोलत असतो. हिंदी भाषकाला या शिव्या वाटतात. त्या बद्दल आपल्याला कसलीच खंत नसते. आपण मात्र आपल्याला हिंदी येते म्हणून समजतो. आपण स्वतःला उदार समजतो. हा उदारपणा असेलही. परंतु, अशा बोलण्याने परप्रांतिय उद्दाम होतात, त्याना मराठी शिकण्याची आवश्यकताच भासत नाही, याचे आपल्याला भानच राहत नाही. या मागे आपल्या उदारपणापेक्षा  स्वाभिमानशून्यता, अगतिकपणा व कमकुवताच जास्त प्रभावी असते. मराठी माणसाला आत्मविश्वास मिळवून देण्याकरता विभागीय साहित्य संमेलने हातभार लावतील.
आपली संस्कृती टिकवण्याकरता मराठी भाषेत आपण सर्व प्रविण असणे अत्यंत गरजेचे आहे. सांस्कृतिक साहित्य मराठीतून शिकलो तरच आपण उत्तम प्रकारे ग्रहण करु शकतो. इंग्रजीतून आपण तुकाराम योग्य प्रकारे समजू शकत नाही. ज्ञानेश्वराला समजण्याकरता मराठी आलेच पाहिजे. आपली संस्कृती आपण सोडून दिली तर आपल्यात वेगळेपण राहणार नाही. आपण इतर कोणाचे गुलाम बनू. विभागीय साहित्य संमेलने प्रत्येक मराठी माणसाला मराठी उत्तम प्रकारे आत्मसात करण्यास उद्युक्त करतील.
तेंव्हा सर्व मराठी भाषकानी एकमुखाने म्हणू या "मराठी भाषेचा विजय असो"

No comments:

Popular Posts